Your Own Digital Platform

पाचगणीत नवा वाहतूक आराखडा


पाचगणी : पाचगणी या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळी पोलिसांकडून वाहतूक नियमावलींची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. ही अंमलबजावणी केल्याने शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या छत्रपती शिवाजी चौकाने मोकळा श्‍वास घेतला आहे. पाचगणी पोलिसांनी नवीन वाहतूक आराखडा तयार केल्याने शहरातील वाहतुकीस शिस्त लागत आहे. पाचगणीहून महाबळेश्‍वरकडे जाताना रस्त्याच्या उजव्या बाजुला दुचाकी पार्किंग, तर डाव्या बाजुला चारचाकी पार्किंगची व्यवस्था पोलिसांकडून करण्यात आली आहे. तसेच पाचगणीच्या टेबल लँडकरता छत्रपती शिवाजी चैाकातून एकेरी वाहतूक सुरु केल्याने चौकातील वाहतूक कोंडी थांबली आहे.

पोलिसांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रभावीपणे काम सुरु केले आहे. नियमांचे पालन न करणार्‍या वाहनधारकांना दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागत आहे. पोलिसांनी वाहनधारकांवर कारवाई करुन तीस हजार रुपायांचा दंड वसूल केला आहे. वाहतुकीतील बदलामुळे शहरास शिस्त लागणार आहे. नागरिक व पर्यटकांचे सहकार्य पोलिसांना मिळत आहे. पाचगणीत वर्षाकाठी लाखो पर्यटक भेट देतात. मात्र वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने पर्यटकांना व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यावर उपाय काढत पाचगणी पोलिसांनी वाहतूक आराखडा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरु केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.