Your Own Digital Platform

पण इथे बांडगुळे जन्मली; रामराजेंवर उदयनराजेंचा घणाघात


सातारा : स्थानिकांना संधी मिळावी म्हणून शिरवळ, खंडाळा एमआयडीसीत लक्ष घातले. पण त्याठिकाणी व्यक्तिकेंद्रीत आमदारांचे वेस्टेड इंटरेस्ट आहेत. सोना अलाईज कंपनीच्या जैनला मारायचे असते तर पूर्वीच ठोकला असता. सातार्‍याने देशाला दिशा देण्याचे काम केले. स्वातंत्र्यांची प्रत्येक चळवळ याच जिल्ह्यातून सुरु झाली. पण या जिल्ह्यात आज षंढ निर्माण झाले आहेत. कुणीही यावे आणि टपली मारुन जावे, अशी परिस्थिती आहे. बारामती, कराड जिल्हे करुन सातारा खालसा करण्याचा डाव हाणून पाडला. मी विरोध केला. पण इथे वळवळ करणारी बांडगुळे जन्मली, असा घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर पत्रकार परिषदेत केला.

सातार्‍यातील एमआयडीसी संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, मी कधीही कुणाच्या द्वेषापोटी बोलत नाही. पूर्वी जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी एमआयडीसी दिली जायची. त्याच ठिकाणी कंपनी उभारायला परवानगी असायची. सातार्‍यातही मोठ्या नामवंत उद्योगपतींच्या कंपन्या होत्या. त्यावेळी माझे काका अभयसिंहराजे भोसले जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांनी या कंपन्या टिकवण्यासाठी लक्ष द्यायला हवे होते.त्यांनी या कंपन्यांचा विस्तार होवू दिला नाही. गावगुंड लोक युनियन करुन त्या कंपन्यांकडून पैसे घ्यायचे. अशाच लोकांना त्यांनी सहकार्य केले. त्यामुळे सातार्‍यातील एमआयडीसी बंद पडत गेली. सातार्‍याबरोबरच नगर जिल्ह्यातही एमआयडीसी सुरु झाली होती. नगरच्या एमआयडीसीची ओळख निर्माण झाली. पण सातार्‍याची एमआयडीसी ‘ट्रबल्ड एमआयडीसी’ म्हणून बदनाम झाली.एलएनटी ही मोठी कंपनीसुध्दा याठिकाणी कंपनी सुरु करणार होती. पण त्यांनाही त्यावेळी पैसे मागिल्याने ते निघून गेले. अशा प्रकारांमुळे लोक सातार्‍यात यायला मागत नाहीत. बाबासाहेब कल्याणी तसेच शिर्के यांच्याशी माझी चर्चा झाली. सातार्‍यात किंवा तुमची जन्मभूमी असेल त्याठिकाणी कंपन्या सुरु करा म्हणून त्यांना सांगितले. 

जरंडेश्वर रेल्वेस्टेशनजवळ 150 ते 200 एकरावर बाबासाहेब कल्याणी यांच्याकडून मोठी इंडस्ट्री सुरु केली जाणार असून संरक्षण खात्यासाठी आवश्यक साहित्याची निर्मिती केली जाणार आहे. खंडाळा तसेच शिरवळ याठिकाणी एमआयडीसी वाढावी यासाठी लक्ष घालायला गेलो. पण व्यक्तिकेंद्रित माणूस झाल्यावर कामच होवू शकत नाही याचा अनुभव आला. त्याठिकाणी एसईझेड झोन असल्यामुळे स्थानिक मुलांना नोकरीत घ्यावे. त्यांना प्राधान्य द्यावे,अशी मागणी संबंधित कंपन्यांकडे केली. पण त्याठिकाणी प्रत्येक आमदाराचे ‘वेस्टेड इंटरेस्ट’ असल्याचे दिसून आले. त्याठिकाणच्या सोना अलाईज कंपनीचे जैन यांनाही यासंदर्भात चर्चेसाठी याठिकाणी बोलावले होते. मला त्यांना मारहाण करायची असती तर त्यांना याआधीच ठोकले असते. याठिकाणी फक्त चर्चा करण्यासाठीच बोलवले होते असे उदयनराजे म्हणाले.

जिल्ह्यात काही स्वयंघोषित नेते झाले आहेत. त्यांचे नाव घेतानाही मनात किळस निर्माण होते. एवढ्या संकुचित विचाराचे काही लोक आहेत. त्या कंपन्यांमध्ये कमी पगारावर बिहारचे लोक भरले आहेत. त्यांना दहा हजार पगार ठरवायचा आणि दोनच हजार द्यायचे. अशी हजारो पोरं त्याठिकाणी काम करत असून दोन कोटी कुणाच्या खिशात जातात? असा सवाल उदयनराजेंनी केला. सातार्‍यात कुणीही यावे आणि टपल्या मारुन जावे, अशी परिस्थिती या माणसांमुळे निर्माण झाली आहे. बारामती आणि कराड जिल्हा करुन सातारा जिल्हा खालसा करायचा प्रयत्न होता. अशावेळी आमचे खलनायक गप्प बसले. या सर्व गोष्टींना मी विरोध केला. त्यामुळे मी बोलतो असे वाटते. पण लोकांच्या तोंडचा घास हिरावून घेणार असाल तर कोण गप्प बसेल? खलनायक आमदार गप्प बसले पण मी गप्प नाही, बसणार असा इशाराही खा. उदयनराजे यांनी दिला.