Your Own Digital Platform

उदयनराजे आयत्या बिळावर नागोबा : शिवेंद्रराजे


सातारा : खा. उदयनराजेंना मीपणाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचाराची गरज आहे. काम करणार दुसराच आणि श्रेय घेणार हे. उदयनराजे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा आहेत, असा पलटवार आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी ‘सुरुची’ या त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, कोंबडी खुडूक आहे का? हे कसे तपासले जाते ही कला उदयनराजेंनाच माहीत असावी. ही कला ते दिल्लीत शिकले का? असा प्रतिटोलाही त्यांनी हाणला. खासदारकीनंतर आमदारकी आहे म्हणून दबाव टाकणार्‍या खासदारांबाबतचा आमचा प्लॅन तयार असल्याचा गौप्यस्फोटही आ. शिवेंद्रराजे यांनी केला.आ. शिवेंद्रराजे म्हणाले, उदयनराजेंसारखी आम्ही दाढी, मिशा भुवया काढत नाही. दाढी सोडून मी काय वाढवत नाही. त्यांची दाढी का वाढत नाही, यावर मी बोलणार नाही. माझ्यावर त्यांनी खुडूक कोंबडी म्हणून टीका केली; पण खुडूक काय असते त्यांना माहिती आहे का? तशा पार्टीला त्यांना कोंबड्या लागतातच; पण आम्ही कधी कुणाच्या कोंबड्या पळवल्या नाहीत. कोंबडी खुडूक आहे की अंड्यावर आहे, हे त्यांना कसे काय माहीत? कोंबड्या तपासायची कला बहुतेक ते दिल्लीत शिकले असतील. आता ते भेटले तर हातात हात न देता लांबूनच नमस्कार करायला हवा. नाही तर आमच्या हाताला घाण वास यायचा, अशी टीकाही त्यांनी केली.

शरद पवारांनी उदयनराजेंना खासदारकीचे तिकीट दिले तर काम करणार का? इतर आमदार तुमच्यासोबत राहतील का? असे विचारले असता, आ. शिवेंद्रराजे म्हणाले, आम्ही शरद पवार यांचे नेतृत्व मानतो. ते चुकीचा निर्णय घेणार नाहीत. त्यांच्या खासदारकीचे काय ते उदयनराजेंनी ठरवावे. भाऊसाहेब महाराजांचाही शरद पवारांवर विश्‍वास होता आणि माझाही आहे. इतर आमदार बरोबर राहतील की नाही माहित नाही. आपापला निर्णय ते पवारसाहेबांना सांगतील. आमदारांबाबत ते दमाची भाषा बोलत आहेत. त्यामुळे आमच्या आमदारकी आधी त्यांच्या खासदारकीबाबतचा प्लॅन ठरला आहे, असा गौप्यस्फोटही शिवेंद्रराजेंनी केला.तुमच्याकडे सर्वमान्य खासदारकीचा उमेदवार आहे का? असे विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, लोकसभा निवडणुकीस अजून वेळ आहे. अभिजीत बिचुकले कवीमनाचा सर्वमान्य उमेदवार आहे, असे त्यांनी हसत-हसत सांगितले.

42 वर्षे सत्ता असताना काय कामे केली? या उदयनराजेंच्या प्रश्‍नाबाबत विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, आम्ही कामे केली म्हणून जनतेने आम्हाला सातत्याने निवडून दिले आणि तुम्हाला घरी बसवले. उदयनराजे किती वर्षे सातार्‍यात राहिलेत? मनोमीलन झाले त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले आणि खासदार झाले. पूर्वी हिंदूराव नाईक निंबाळकर, प्रतापराव भोसले खासदारकीला उभे असताना ते अपक्ष म्हणून निवडणूक लढले आणि पडले. याची त्यांनी जाणीव ठेवावी. आमच्यामुळेच जिल्हा बँकेत, नगरपालिकेत ते सत्तेत राहिले, आता जिल्हा परिषदेत त्यांची सत्ता आहे का? सातारा तालुक्याबाहेर त्यांची कुठे सत्ता दिसते? असा सवालही शिवेंद्रराजे यांनी केला.

सातारकरांचे राजघराण्यावर प्रेम आहे, त्याचा पुरेपूर फायदा उदयनराजे उठवत आहेत. लोकसभेची निवडणूक झाली की खासदार अज्ञातवासात असतात. त्यांना विकासकामे आणि लोकांची आठवण होत नाही. कुणाच्या लग्नाकडेही फिरकत नाहीत. अशावेळी ‘कार्यबाहुल्या’मुळे खासदार येवू शकत नाहीत, अशा खास शब्दांत त्यांचे पीए दामले कळवतात. ‘बारामती’च्या नावाने खडे फोडायचे आणि त्यानंतर मिठ्या मारायच्या. तुमच्या पाठीचा कणा ताठ आहे ना? मग ताठ मानेने जगा ना. जिल्ह्यात कुणी मंत्री आला की बुके घेवून का पळता? राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप नेत्यांचे उंबरे का झिजवता? तुम्ही आमदारकीच्या निवडणुकीत बघून घेवू म्हणता पण तुमच्या आधी आम्ही बघून घेणार आहोत. मला आज, उद्या किंवा कधीही बघून घ्या, असे खुले आव्हानच आ. शिवेंद्रराजे यांनी दिले. उदयनराजेंनी स्वत:ची उंची वाढवण्यासाठी दुसर्‍यांवर आरोप करुन बदनाम करु नये. सध्या वेळ असल्यामुळे उदयनराजे हे नक्कल, मिमीक्री करत आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

जिल्ह्यातील सर्वांत स्वार्थी नेता म्हणून कुणी असेल ते उदयनराजे आहेत. राजकारणात समस्या आली की उडी मारण्याची त्यांची तयारी असते. राष्ट्रवादीकडून उमेदवारीबाबत साशंकता निर्माण झाली की ते भाजपकडे जातात. त्यांच्यावर वेळ आली की वाढदिवसाला बोलवतात. आम्ही खलनायक आहोत तर आम्हाला बोलवता कशाला? तुम्ही वाढदिवसाला बोलवावे म्हणून आम्ही तुमच्या घराभोवती घिरट्या घालत होतो का? असा सवाल त्यांनी केला.

आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, खा. उदयनराजेंच्या पक्षात आणि बाहेरही अडचणी वाढल्या आहेत. मी म्हणेल तसेच सगळ्यांनी केले पाहिजे. माझ्या मनासारखे सगळ्यांनी वागले पाहिजे. माझ्याच मागे सगळ्यांनी आले पाहिजे असे त्यांना वाटते. माझ्यामुळे सातारा टिकला असे उदयनराजे सांगत असले तरी सातारानगरही ही शाहू महाराजांनी स्थापन केली आहे. पण माझ्यामुळे सातारा आहे या भ्रमात उदयनराजे आहेत. त्यांना लोकसभेचे स्वप्न सारखे पडते. त्यांच्यासमोरील अडचणी संपणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

सातार्‍यात जी कामे झाली ती पूर्वीच मंजूर झालेली होती. छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना पोवईनाक्यावर उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे त्याठिकाणी उड्डाणपूल करणे शक्य नव्हते. त्यानंतर या खात्याचे चंद्रकांत पाटील मंत्री झाल्यानंतर या कामाला वेग आला. त्यांनी ग्रेड सेपरेटरचे काम मंजूर करुन निधी उपलब्ध केला. त्यावेळी खासदारांच्या हस्ते नारळ फोडला. कुठेतरी फोटोसेशन करत ग्रेड सेपरेटरचे काम मी केले असे उदयनराजे सांगत आहेत. सातारा पालिकेत त्यांची सत्ता आहे म्हणून त्यांनी कास उंची वाढवण्याच्या कामाचे केलेले भूमिपूजन ही औपचारिकता आहे. वास्तविक उपमुख्यमंत्री असताना अजितदादा पवार यांनी या कामास मंजुरी देवून निधी उपलब्ध केला. या कामाशी खासदारांचा लांबपर्यंत संबंध नाही. तरीही त्याचे श्रेय ते घेत आहेत.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातार्‍यात पासपोर्टचे सेवा केंद्र सुरु झाले, त्याची माहिती घेतली. मोदींच्या धोरणानुसार ही केंद्रे देण्यात आली आहेत. खासदारांचा त्याच्याशी काही संबंध नाही. सातार्‍याप्रमाणे सोलापूर, कोल्हापूर, सांगली याही ठिकाणी अशी केंद्रे देण्यात आली आहेत. दुसर्‍याने केलेली कामे मीच केली म्हणून सांगण्याची खासदारांची सवय जुनी आहे. उदयनराजे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा आहेत. या केंद्राच्या उद्घाटनाला मोदींना वेळ नसेल म्हणून त्यांनी ‘एमपी को बुलाव और रिबन कापो’, असे सांगितले असेल. मग यांनी रिबन कापली. एमआयडीसीबद्दल ते सांगत असले तरी सातारा सोडाच पण लोणंद, शिरवळसह सर्व एमआयडीसीमध्ये यांच्या दहशतीचे वातावरण आहे. माझ्याबद्दल किती लोक बोलतात? यांच्या खंडण्यांमुळे सातार्‍यात यायला कारखानदार तयार नाहीत. वाईच्या गरवारे रोप कंपनीलाही यांनी त्रास दिल्याचा आरोप आ. शिवेंद्रराजे यांनी केला.

तुमचा ब्रेन फलटणला आहे, याबाबत विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, माझा ब्रेन माझ्या डोक्यातच आहे. म्हणूनच 42 वर्षे सत्ता राहिली. मी कुणाचाही रिमोट नसल्याचे त्यांनी सांगितले.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, त्यांनी आमच्या मुलाचा विचार करु नये. माझा मुलगा मोठा झाल्यावर त्याचे निर्णय तो घेईल. त्यांच्यावर वेळ आली की मनोमीलन आठवते. त्यानंतर आमदारकीच्या निवडणुका आल्या की त्यांची लोक माझ्याविरोधात काम करतात. त्यांनी निवडणुकीपूर्वी केलेले हे नाटक नव्हे तर नौटंकी आहे. कधी पप्पी तर कधी मिठी हे सर्व मी पाहिले आहे. त्यामुळे आता पुन्हा फसायचे नाही, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

तुम्ही प्रेम चोपडा असल्याने मी खलनायक

आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खा. उदयनराजेंनी केलेल्या ‘खलनायक’ या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले, तुम्ही प्रेम चोपडा आहात म्हणून मला त्यांच्याशी अमोल पालेकर बनून संघर्ष करता येणार नाही. खलनायकाशी लढताना हीरोलाही खलनायक व्हावे लागते म्हणून मी खलनायक आहे. चित्रपटात बघा प्रेम चोपडा हा खलनायक कधी कुणाला अंगावर घेत नाही. या चोपडासारखीच त्यांनाही दाढी मिशा नाहीत. हा प्रेम चोपडा सतत वेगवेगळ्या भूमिकेत असतो. उदयनराजेंचे कर्तृत्व हे प्रेम चोपडासाररखे आहे. त्यामुळे त्यांना प्रेम चोपडाचीच उपमा दिलेली बरी.