Your Own Digital Platform

सातारा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मची उंची वाढली


सातारा : रेल्वे मंत्रालयाने पुणे-मिरज-कोल्हापूर मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाला कोट्यवधी रूपयांचा निधी दिला असल्याने पुणे ते कोल्हापूर रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेच्यावतीने युध्दपातळीवर कामे हाती घेण्यात आली आहेत. सातारा रेल्वे स्थानकात दुहेरीकरणाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीसह प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 ची उंची वाढवण्याचे काम सुरू असल्याने सातारा रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलू लागला आहे. दै. ‘पुढारी’च्या दणक्यामुळेच हा प्रश्‍न मार्गी लागल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्‍त केले आहे.

रेल्वे मंत्रालयाने पुणे- मिरज- कोल्हापूर मार्गाच्या विद्युतीकरणासाठी 513 कोटींच्या निधीला तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. विभागीय रेल्वे आणि पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑल इंडियामध्ये (पीजीसीआयल) करार झाल्यानंतर हा निधी वर्ग करण्यात आला आहे. कोल्हापूर ते पुणे 326 किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण केले जाणार आहे. दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाला गती मिळणार असल्याने कोल्हापूर ते पुण्यापर्यंतचा प्रवास चार तासात होणार आहे. मिरज ते लोंढा या 189 किलोमीटर मार्गासाठी 208 कोटी रूपये तत्त्वतः मंजूर केले असून पुणे ते कोल्हापूर दरम्यान विविध कामे युध्दपातळीवर सुरू आहेत.

सातारा येथील रेल्वे स्थानक परिसरात दुहेरीकरणासंदर्भातील प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांचे निवासस्थानही सातारा रेल्वे स्टेशन परिसरात बांधण्यात येणार आहे तसेच सातारा येथे रेल्वेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे कार्यालय होणार असून या कार्यालयातून पुणे ते कोल्हापूर दरम्यानचा कार्यभार हाकण्यात येणार आहे. विद्युतीकरण व दुहेरीकरणाच्या कामांमुळे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या भेटीही सातारा रेल्वे स्थानकावर वाढू लागल्या आहेत.

सध्या सातारा रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम रेल्वे प्रशासनामार्फत युध्दपातळीवर हाती घेण्यात आले. त्यानुसार प्लॅटफॉर्म 2 ची उंची आता 1 फुटांने वाढविण्यात आल्याने हा प्लॅटफॉर्म आता साडेतीन फुटाचा झाला आहे. प्लॅटफार्म 1 ची उंची 1 फुटाने वाढवण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. दै. ‘पुढारी’ने प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याबाबत वारंवार वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेवून मध्य रेल्वेच्या प्रशासनाने प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम सुरू केल्याने रेल्वे प्रवाशांनी ‘पुढारी’ला धन्यवाद दिले.रेल्वे प्रशासनामार्फत प्लॅटफॉर्म 1 वर ठिकठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी पत्राशेडही उभारण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

पुणे ते कोल्हापूर रेल्वे मार्गावर भराव टाकण्याचे कामही ठिकठिकाणी सुरू आहे तर काही ठिकाणी टेलिफोन विभागाची कामे रेल्वेने हाती घेतली आहेत. पुणे ते कोल्हापूर मार्गाच्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाला सध्या चांगलीच गती मिळाली आहे. त्यामुळे ही सर्व कामे पूर्ण होण्यासाठी सुमारे 4 वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर ते पुण्यापर्यंतचा प्रवास चार तासात होणार आहे.