Your Own Digital Platform

भैयू महाराज हेदेखील माणूसच ना..?


पाटण : अनेकांच्या प्रश्‍नांची तत्काळ समाधानकारक उत्तरे देणारे आध्यात्मिक गुरू तथा राष्ट्रसंत भैयूजी महाराज यांच्या आत्महत्येनंतर त्यापाठीमागचे अनेक प्रश्‍नांची उत्तरे तशीच ठेवत त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने अनेक नवनवीन प्रश्‍नांचा जन्म होत असतानाच परिस्थिती व सोयीनुसार प्रश्‍न आणि उत्तरेही तयार करण्याचा सामाजिक प्रयत्न सध्या सुरू आहे. त्याचवेळी जगाला ज्ञान व दिलासा देत तणावमुक्त जीवनपद्धती जगण्याचा संदेश देणारा हाच गुरू तणावातून असे टोकाचे पाऊल कसे काय उचलतो ? अशा सामान्य जनभावनाही स्वाभाविकच आहेत. या सर्व एक बाजू असल्यातरी ते कितीही महान असले तरी एक ‘माणूस’ होते या दुसर्‍या बाजूचाही विचार होणे तितकेच महत्त्वाचे असल्याचेही विसरून चालणार नाही. ‘दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा. पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे वास्तव आणि वस्तूस्थिती आहे हे निश्‍चित. भैयू महाराज आपल्या सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिक संपदेवर अल्पावधीतच राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेलं एक उत्तुंग व्यक्तीमत्व. स्वाभाविकच मग साधू, संताच्या रांगेत गेलेल्या अशा थोर महात्म्याला अशाप्रकारे जीवन संपविण्याचा नैतिक अधिकार आहे की नाही हा चिंतनाचा विषय आहे.

तर त्यांच्या अशा कृतीमुळे त्यांचे शिष्य, अनुयायी एका बाजूला पोरके झाले त्याचवेळी त्यांच्या प्रतिमेला व जनसामान्यांच्या श्रद्धेलाही एकप्रकारे तडा गेला हे नाकारून चालणार नाही अथवा या कृत्याचे समर्थनही होवू शकणार नाही. मात्र त्याचवेळी जगाला तणावमुक्तीचा संदेश देणारा हाच गुरू ज्यावेळी स्वतः तणावात राहून अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलतो त्यावेळी त्याच तणावाची तीव्रता किती भयानक असू शकते याचाही किमान विचार होणे गरजेचे आहे.

भैयू महाराज यांच्या अशा जाण्याने प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार त्याचे तर्क वितर्क व अर्थ लावत असला तरी यातील नक्की वस्तूस्थिती काय ? हे केवळ भैयू महाराज यांनाच माहीत. त्यामुळे यापैकी काही प्रश्‍नांची कायद्यासाठी किंवा व्यवहारासाठी उत्तरे मिळतीलही. परंतू ती मिळाली म्हणून ते परत मिळणार नाहीत हेही तितकेच महत्वाचे आहे. त्यांच्यातील एक माणूस आणि त्या माणसाच्या सहनशीलतेचा अंत झाल्यानंतर मग भावनीकता असो अथवा अन्य काहीही कारणे त्यातून घडलेली ही कृती म्हणूनही या घटनेकडे डोळसपणे पहाण्याची तितकीच सामाजिक नजरही महत्वाची आहे.

निश्‍चितच भैयू महाराज यांच्या अशा जाण्याने अनेक निरूत्तरीत प्रश्‍न निर्माण झाले आहेत. कदाचित या शोधात यापैकी काही प्रश्‍नांची उत्तरे मिळतीलही पण भैयू महाराज परत मिळणार नाहीत हेच सत्य आहे. त्यामुळे त्यांचे आदर्श, परंपरा व विचार जपताना त्यांच्या या कृतीकडे एका मानवी नजरेतून पहाण्याचा डोळसपणे प्रयत्न केला तर निश्‍चितच मग किमान काही प्रश्‍नांची उत्तरे आपली आपल्यालाच मिळतील .