Your Own Digital Platform

दोन अपघातात ५ ठार


लोणंद : लोणंद-निरा रस्त्यावरील पाडेगाव गावच्या हद्दीत रविवारी रात्री 11 वाजता भरधाव वेगात आलेली जीप निरा उजव्या कालव्यात कोसळून 3 ठार, तर 6 जण जखमी झाले. महेश जगन्‍नाथ बल्लाळ (वय 26), दादा गोरख बल्लाळ (4 , दोघे रा. बल्लाळवाडी) आणि सृष्टी संतोष साळुंखे (9 रा. दानवलेवाडी) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर अन्य सहा जण जखमी झाले आहेत. कॅनॉलमध्ये गावातील युवकांनी उड्या मारून जखमींना बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, माण तालुक्यातील वावरहिरे येथील साळुंखे आणि बल्लाळ या दोन कुटुंबांतील 7 जणांसह 9 जण भाग्यश्री टुर्स अँड ट्रॅॅव्हल्सच्या जीप (एम.एच. 42 एक्यू 574) मधून रात्री पावणेआठला मुंबईला निघाले होते. वावरहिरेतून लोणंदपर्यंतचा प्रवास झाल्यानंतर लोणंदच्या पुढे सुरभी ढाब्यावर या सर्वांनी जेवण केले. यावेळी चालक महेश बल्‍लाळ याने मद्यपान केले होते. यावेळी इतर नातेवाईकांनी महेशला मद्यपान करून गाडी न चालवण्याचा सल्‍ला दिला होता. मात्र, महेशने हे ऐकले नाही. जेेवण झाल्यानंतर महेशने पुन्हा गाडी चालवण्यास सुरूवात केली. 2-3 किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर गाडी पाडेगावच्या हद्दीतून जाणार्‍या निरा उजव्या कॅनॉलच्या वळणावर आल्यानंतर महेशचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी थेट कॅनॉलमध्ये जाऊन पडली.

पाण्याच्या वेगाने जीप पाण्यातच एका बाजूला उभी राहिली. या अपघाताचा आवाज ऐकल्यानंतर कॅनॉल जवळील पाडेगाव येथील नवले कुटूंबातील युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. याच दरम्यान एका आरोपीच्या शोधात असलेले लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे व त्यांचे सहकारी स. फौ. बी व्ही वाघमारे, कॉ. शिवाजी तोरडमल, कॉ.व्ही बी शिंदे , कॉ.एस वाय महामुलकर , कॉ.एल बी डोंबाळे, कॉ. विशाल वाघमारे, कॉ. संजय देशमुख, शिवसेना शहर प्रमुख सुनिल यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर ग्रामस्थ निखिल नवले, रोहीत नवले, कॉ. अविनाश शिंदे, कॉ. रोहित गायकवाड यांनी पाण्यात उड्या मारून जीप मध्ये अडकलेल्या प्रवाशांना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले.

यामध्ये चालक महेश बल्‍लाळ, दादा बल्‍लाळ व सृष्टी साळूंखे, अविंदा संतोष साळुंखे, सुजल संतोष साळुंखे, उज्वला गोरख बल्‍लाळ, संतोष साळुंखे, सुधीर बल्‍लाळ आणि गोरख बल्‍लाळ हे जखमी झाले आहे. हा अपघात झाल्यानंतर सपोनि लांडे यांनी तात्काळ डॉ. नितीन सावंत, डॉ. दिपक गोरड, डॉ. मकरंद डोंबाळे , डॉ. किशोर बुटीयानी , डॉ. सौ. स्वाती शहा, डॉ.जयेश रावळ यांच्याशी संपर्क साधून उपचारासाठी तयारी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्यांवर लवकर उपचार होऊ शकले. तरीही उपचारादरम्यान महेश, दादा व सृष्टी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुधीर बल्‍लाळ यांनी लोणंद पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

दुचाकींच्या धडकेत दोघांचा मृत्यू

औंध ते पळशी रस्त्यावर खरशिंगेनजीक सोमवारी दुपारी 3 वाजता दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही युवकांच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. रणजित पांडुरंग देशमुख (वय 28) व शंकर तुकाराम रणदिवे (38) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी, सोमवारी दुपारी रणजित देशमुख हे दुचाकीवरून खरशिंगेमार्गे जायगाव येथे निघाले होते. तर औंध येथील शंकर रणदिवे हे पळशी येथील एचपीसीएल येथील कंपनीच्या पेट्रोललाईन तपासणीच्या कामावर निघाले होते. हे दोघेही खरशिंगे येथील धनगर वस्तीनजीकच्या रस्त्यावर आले असता त्यांची अचानक समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरात होती की, दोघेही काही फूट अंतरावर उडून पडले होते. दोघांच्याही डोक्यातून खूप प्रमाणात रक्‍तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना औंध परिसरात वार्‍यासारखी पसरताच नागरिक, युवकांची अपघातस्थळी व ग्रामीण रुग्णालयात गर्दी झाली होती. या घटनेची नोंद औंध पोलिस ठाण्यात झाली आहे.

दरम्यान, अपघात समयी रणजित देशमुख यांच्या दुचाकीला हेल्मेट अडकवले असल्याचे आढळून आले. हेच हेल्मेट त्यांनी डोक्याला घातले असते तर त्यंचे प्राण वाचले असते अशी चर्चा परिसरात सुरू होती. त्याचबरोबर औंध ते खरशिंगे रस्त्यावर ज्या धनगर वस्तीनजीक हा अपघात झाला तो रस्ता सरळ असून त्याठिकाणी अपघात झालाच कसा? हे न उलगडणारे कोडे आहे.

दोन्ही कुटूंबे झाली पोरकी

शंकर रणदिवे यांच्यावर त्यांच्या कुटूंबाची जबाबदारी होती. त्यांच्या पश्‍चात पत्नी तीन मुले असा परिवार आहे. पण त्यांच्या आकस्मिक मूत्युमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. तर रणजित देशमुख हे हरणाई सूतगिरणी मध्ये नोकरीला होते. त्यांच्या घरात ते एकुलते एक होते. वडीलांच्या पश्‍चात त्यांच्या आईची जबाबदारी त्यांच्यावर होती. या अपघातात दोन तरणीबांड पोर गेल्याने दोन्ही कुटूंबे पोरकी झाली आहेत.