Your Own Digital Platform

जातीयवादी सेनेसोबत जाण्याचा प्रश्नच नाही : पृथ्वीराज चव्हाण


कराड : शिवसेना हा जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सेनेसोबत निवडणूक लढवण्याचा विचार कधीच होणार नसल्याचे संकेत दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस -राष्ट्रवादीची आघाडी निश्चितपणे होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आगामी निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षासारखे छोटे- मोठे पक्षांना सोबत घेण्याबाबतच्या हालचाली सुरू आहेत. मात्र शिवसेनेला आम्ही जातीयवादी पक्ष मानतो. त्यामुळेच सध्यस्थितीत तरी शिवसेनेसोबत निवडणुकीपूर्वी अथवा निवडणुकीनंतर कॉंग्रेसकडून आघाडी करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्पष्ट संकेत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.

कराडमध्ये आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. चव्हाण म्हणाले की, शिवसेना आज भाजपासोबत सत्तेत असूनही विरोधी पक्षांसारखी भूमिका घेत आहे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडत नाही. मुख्यमंत्रीही साम, दाम, दंड, भेदची भाषा वापरत आहेत. भाजपा स्वबळावर सत्तेत येऊ शकत नाही, हे वास्तव आहे. भाजपा नेत्यांनाही याची माहिती आहे. त्यामुळे काहीही झाले तरी ते शिवसेनाला युतीतून बाहेर पडू देणार नाहीत. राज्यातच नव्हे तर देशातही अशीच स्थिती असून भाजपा मित्रपक्षांना सोबत राखण्यासाठी सर्व मार्गाचा अवलंब करत आहे. मात्र शिवसेनेचे सध्याची भूमिका पाहता ते भाजपाशी युती करणार नाहीत, असे आपणास वाटते. मात्र त्यामुळे आम्ही त्यांच्याशी आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यास चांगलेच होईल, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले.