Your Own Digital Platform

एस. टी. बंदचा फटका असंख्य प्रवाशांना


म्हसवड : बहुजन हिताय बहुजन सुखाय असे बिरुद डोक्यावर घेवुन अवघा महाराष्ट्र पालथा घालत असलेल्या एस. टी. च्या वाहक -चालकांनी काल रात्री पासुन अचानक बंद पुकारल्याने एस. टी. ची चाके सर्वत्र थांबली असुन यामुळे मात्र प्रवाशांचे हाल सुरु झाले आहेत. 

वेतनवाढी साठी एस. टी. च्या कर्मचार्यांनी कोणतीही पुर्व सुचना न देता दि. ७ जुन च्या मध्यरात्री पासुन अचानक बंद पुकारल्याने जागोजागी एस. टी. ची चाके थबकली आहेत, या बंदची कसलीच माहिती नसल्याने प्रवासीवर्गाला मात्र याचा चांगलाच फटका बसल्याचे चित्र म्हसवड बसस्थानकात दिसुन आले. 
 
या बंद बाबत आम्ही काही एस. टी. च्या वाहक चालकांशी चर्चा केली असता त्यांनी सांगीतले की एस. टी. प्रशासनाने केलेली वेतनवाढ ही कोणालाही विश्वासात न घेता केली असुन ती आम्हाला मान्य नाही एकीकडे एस. टी. ने वेतनवाढ केली असली तरी ती फक्त दिखावु स्वरुपाची आहे, आम्हाला दरवर्षी मिळणारी वार्षीक वेतनवाढ ३ टक्के होती त्यामध्ये आता कपात करुन ती २ टक्के केली आहे तर १० टक्के मिळणारे वार्षीक घरभाड्यात ही मोठी कपात करुन ते ७ टक्के करण्यात आले आहे अशा अनेक बाबतीत एस. टी. प्रशासनाने कर्मचार्यांची अर्थिक कोंडी केली असुन वेतनवाढीचा फक्त दिखावा केला आहे त्यामुळे एस. टी. ला आमची ताकत दाखवण्यासाठी व आम्हाला स्वत:ला न्याय मिळवण्यासाठी च आम्ही हा बंद पुकारला असुन यामध्ये प्रवाशांना त्रास व्हावा हा आमचा हेतु नाहीच पण आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही, प्रवाशांनीही आमच्या अडचणी समजुन घ्याव्यात असे आवाहन संपात सहभागी असलेल्या एस. टी. च्या कर्मचार्यांनी केले आहे. 

दरम्यान एस. टी. च्या अचानक सुरु झालेल्या या संपाचा फटका मात्र सर्वसामान्य प्रवाशांना चांगलाच बसल्याने अनेक प्रवाशांची यामुळे चांगलीच तारांबळ झाली, नेहमीप्रमाणे एस. टी. साठी बसस्थानकात आलेल्या प्रवाशांना या बंद विषयी काहीच माहिती नसल्याने जो तो एस. टी. वाट बसस्थानकात तिष्ठित बसावे लागले खुप वेळ वाट पाहुनही एस. टी. येत नसल्याने काही प्रवाशांनी येथील वाहतुक नियंत्रण कक्षात जावुन याविषयी चौकशी केली असता त्यांनी सदर संपाविषयी माहिती मिळताच काहींनी मग इच्छित स्थळी जाण्यासाठी वडापचा आधार घेतला तर काहींनी आपले परगावी जाणेच रद्द केले. सध्या उन्हाळ्याच्या सुट्टया संपत आल्याने प्रवासी वर्ग गावाकडे जाण्यासाठी रोज बसस्थानक गर्दी करीत असुन या प्रवाशांना या बंदचा मोठा फटका बसला आहे.