Your Own Digital Platform

उरमोडी योजना पूर्ण क्षमतेने चालविणार : प्रभाकर घार्गे


मायणी :- खटाव-माण तालुक्यासह कराड,कोरेगाव,सातारा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ससेहोलपट थांबविण्यासाठी व खटाव तालुक्याचा स्वाभिमान आणि अस्मिता जपण्यासाठी खटाव-माण अँग्रो प्रोसेसिंग लि.या साखर कारखान्याची निर्मिती केली असुन येत्या नोव्हेंबरमध्ये कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू करणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी केले.

खटाव तालुक्यातील शिरसवडी येथे शेअर्स विक्री शुभारंभ व पाझर तलावाच्या दुरुस्तीच्या कामाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी सभापती संदीप मांडवे, समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड,संचालक नंदकुमार मोरे,महेश घार्गे,मार्केट कमिटी सभापती सी.एम.पाटील,विलासराव इंगळे,गोविंद पवार,राजेंद्र खटावकर,दत्ता पवार,मुगुटराव इंगळे,विनायक इंगळे,मधुकर कुकले,वैभव इंगळे,शिवाजी इंगळे,मोहन इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना घार्गे पुढे म्हणाले की,शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून शेतकऱ्यांच्या हक्काचा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून साखर कारखाना उभा केला आहे,येथील युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न या निमित्ताने सुटणार आहे,तालुक्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्रांती या कारखान्याच्या माध्यमातून होणार आहे तसेच उरमोडी योजना पूर्ण ताकतीने चालविण्यासाठी डिसेंबर पासून ते जून महिन्यापर्यंत पाच ते सहा वेळा पाणी आणण्यासाठी कारखाना स्वतः पुढाकार घेणार आहे.प्रतिदिन चार हजार मे. टन गाळप करून १२ मेगावॅट वीजनिर्मिती कारखान्याच्या माध्यमातून होणार आहे.त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सभासद होऊन,आपल्या उसाच्या नोंदी कारखान्याकडे करून घेण्याचे आवाहन यावेळी त्यानी केले.

यावेळी सभापती शिवाजीराव सर्वगोड,संदीप मांडवे,नंदकुमार मोरे,सी.एम. पाटील यांनीही मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन माजी सभापती विलासराव इंगळे यांनी केले.

फोटो:-खटाव तालुक्यातील शिरसवडी येथे खटाव-माण अँग्रो प्रोसेसिंग लि. साखर कारखान्याच्या शेअर्स विक्री शुभारंभ प्रसंगी चेअरमन प्रभाकर घार्गे,व्यासपीठावर शिवाजी सर्वगोड, संदीप मांडवे,नंदकुमार मोरे व मान्यवर.