सातारा : विजेच्या धक्‍क्याने महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू


कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील अंभेरी येथे विजेच्या धक्‍क्याने वायरमनचा मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना घडली. सचिन वसंत फाळके असे ३५ वर्षीय मृत वायरमनचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी स्‍टँड रस्‍त्यावर विजेच्या खांबावर काम सुरू असताना वायरमनला विजेचा धक्‍का बसला. रहिमतपुर उपविभागीय महावितरण कार्यालयात कार्यरत असणारे सचिन फाळके हे गेली पाच वर्षे अंभेरी बीटमध्ये वायरमन म्हणून कर्तव्य बजावत होते. सोमवारी सायंकाळी ते एस टी स्टँडरोड ते अंभेरी रस्त्यावर असणाऱ्या विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेले होते. तेथेच शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना झाल्यानंतर दत्तात्रय निकम यांना फाळके यांची दुचाकी दिसली. येताना आणि जातानाही दुचाकी त्याच ठिकाणी असल्याने निकम यांना आवाज दिला. पण कोणताच प्रतिसाद आला नाही.

सचिन यांना मोबाईलवर संपर्क साधला तर फक्त रिंग वाजत होती. त्यामुळे निकम यांनी ज्या दिशेने रिंग वाजत आहे त्या दिशेने वेध घेतला. यावेळी त्यांना फाळके यांचा मृतदेह दिसला. याची माहिती महावितरण आणि फाळके यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. रात्री १० वाजता पोलिस प्रविण कदम यांनी रहिमतपुर पोलिस ठाण्यात कळविले.

No comments

Powered by Blogger.