Your Own Digital Platform

विस्थापित ५०४ शिक्षकांना पसंतीच्या शाळा


सातारा : राज्याच्या ग्रामविकास विभागाने यावर्षी सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे 4 हजार 15 प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या केल्या मात्र या बदलीप्रक्रियेत सुमारे 670 विस्थापीत झालेल्या शिक्षकांपैकी 504 शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार बदलीचे आदेश देण्यात आले आहेत तर राहिलेल्या 166 शिक्षकांना आता ऑनलाईन शाळा मिळण्याची शक्यता आहे.यावर्षीपासून ग्रामविकास विभागातर्फे ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र यामध्ये अनियमितता असल्याने अनेक शिक्षक विस्थापीत झाले तर काही शिक्षकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. जिल्ह्यातील 670 शिक्षक विस्थापीत झाले होते त्यांच्या बदल्यांची पाचवी फेरी पार पडली. त्यामध्ये त्यांना पसंती क्रमानुसार शाळा देण्यात आल्या.

166 शिक्षकांना अद्यापही शाळा मिळाल्या नाहीत त्यामुळे त्यांना पसंतीच्या शाळा मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यांच्यासाठी सहाव्या फेरीत बदल्यांचे आदेश ऑनलाईन दिले जाणार आहेत. दरम्यान, संवर्ग 2 मधील पती -पत्नींना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणापासून 30 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असल्याचे दाखले सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत. हे अंतराचे दाखले राज्य परिवहन महामंडळाकडून घ्यावे लागणार असल्याने ते मिळविण्यासाठी शिक्षकांची धावाधाव सुरू झाली आहे.