प्लास्टिक निर्मूलनासाठी कठोर निर्णय


सातारा : प्लास्टिक आणि थर्माकोल मुक्त सातारा जिल्ह्यासाठी गावोगावी यापुर्वीच जनजागृती सुरू आहे. मात्र गोळा केलेल्या प्लास्टिक कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यादृष्टीने जिल्हा परिषद प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्तूंची (विक्री, वापर, उत्पादन, साठवणूक, वाहतूक) तरतुदींची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी शनिवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी उपआयुक्त चंद्रकांत गुडेवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन थाडे, चंद्रशेखर जगताप, अविनाश फडतरे, डॉ. विनोद पवार, पर्यावरण तज्ञ नंदकुमार गांधी, मिलिंद पगार उपस्थित होते.

संजीवराजे म्हणाले, प्लास्टिकचा धोका आपल्या जीवनामध्ये निर्माण झाला आहे. त्यामधून मार्ग काय काढायचा? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आरोग्यपूर्ण जीवन जगायचे असेल तर प्लास्टिक कसे बाजूला काढता येईल त्यादृष्टीने प्रत्येकाने मानसिकता केली पाहिजे.

डॉ. कैलास शिंदे म्हणाले, गावपातळीवर जनजागृती झाल्यामुळे सुमारे 47 टन प्लास्टिक जिल्ह्यात गोळा झाले. रस्त्यांच्या कामामध्ये हे प्लास्टिक वापरले जाणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकांसह अन्य घटकांवर याची जबाबदारी वाढली आहे. नंदकुमार गांधी, मिलिंद पगारे यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यशाळेस विविध विभागाचे खातेप्रमुख गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शाखा अभियंता, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत मोरे, विजय निंबाळकर यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी प्लास्टिक कायद्याबाबत प्रश्‍न विचारले.

No comments

Powered by Blogger.