चाफळ परिसरात अवैध वाळू वाहतूक


चाफळ : चाफळसह परिसरात अवैध वाळू वाहतूक जोमात सुरु असून शासनाच्या नियमाप्रमाणे वाळू वाहतूक करणार्‍या वाहनातून ती झाकून घेऊन जाणे बंधनकारक असताना देखील काही वाहनचालक वाळू न झाकता वाहतूक करत आहेत. त्यामुळे दुचाकी व रस्त्याने चालणार्‍या व्यक्तीच्या डोळ्यात वाळूचे कण उडत आहे तर काही दुचाकी स्वारांच्या डोळ्यात वाळूचे कण गेल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होत आहे. याबाबत पाटण तहसीलदार यांनी तातडीने लक्ष घालून उघडी वाळू घेऊन जाणार्‍यां वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

याबाबत चाफळ येथील गावकामगार तलाठी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ऑनलाईन सातबारा तयार करण्यासाठी आम्हाला गेल्या काही दिवसांपासून पाटण येथील तहसीलदार कार्यालयात थांबावे लागत असल्याने चाफळ येथील आमच्या सजात लक्ष घालता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून चाफळ परिसरात बेकायदेशीरपणे चाफळ, माजगांव, चरेगांव येथील उत्तरमांड नदीतील तसेच उरुल येथील ओढ्यातील रात्रीच्या वेळी काढून ठेवलेली वाळू बिनधास्तपणे टँक्टर, डपर ,टँकर मधून वाहतूक केली जात आहे. 

खालकरवाडी येथील उत्तरमांड नदीतील वाळू काढण्यासाठी चक्क गाढवाचा वापर केला जात आहे. गाढवाच्या पाठीवर वाळूची पोती भरुन ती गावातील घराच्या समोर साठवली जाते. वाळूस गिर्‍हाईक आले कि ती वाळू विक्री केली जाते. कोणत्याही प्रकाराची रॉयल्टी काढलेली नसताना देखील उत्तरमांड नदीतून वाळू काढून ती विकणारे एक रॅकेट खालकरवाडी येथे निर्माण झाले आहे. तहसीलदार यांनी उत्तरमांड नदीतील वाळू काढून विकणार्‍याच्यावर व उंब्रज, कोर्टी येथून देखील झाकून न आणणार्‍यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

No comments

Powered by Blogger.