Your Own Digital Platform

अपघातात पोलिसासह दोघे ठार


वडुज : वडूज-पुसेगाव रस्त्यावर वाकेश्‍वर फाटा येथे दि. 12 रोजी रात्री नऊच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पोलिसासह दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. दहिवडी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार अजित टकले व दुचाकीस्वार महादेव वायदंडे अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.याबाबत वडूज पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मंगळावार दि. 12 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास वाकेश्‍वर फाटा वडूज-पुसेगाव रोडवर दहिवडी पोलीस ठाण्यातील पो. हवा. अजित उत्तम टकले ( वय 25 रा. नीरा-फलटण) हे त्यांच्या नवीन बजाज प्लॅटिनावरून डिव्हिजन टपाल देण्यासाठी वडूजकडे जात असताना समोरून वडूज बाजू कडून महादेव सुदाम वायदंडे (वय 27, रा. अण्णाभाऊ साठेनगर, खटाव ) हा त्यांच्या डिलक्स मोटार सायकल क्र. एम एच 13 सी झेड 3426 वरुन येत असताना अजित टकले व महादेव वायदंडे यांच्या दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला. वायदंडे याच्या दुचाकीवरील यशवंत साठे ( रा. अक्कलकोट ), प्रतीक दिलीप वायदंडे ( रा. खटाव ) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ही घटना समजताच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक यशवंत शिर्के व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. वडूज पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास पो. नि. यशवंत शिर्के करीत आहेत.