Your Own Digital Platform

उदयनराजेंच्या ओठात एक अन् पोटात दुसरेच : आमदार शिवेंद्रराजे


सातारा : खा. उदयनराजे मला रयत शिक्षण संस्थेमध्ये घ्यावे असे म्हणत असले तरी त्यांच्या ओठात एक अन् पोटात दुसरेच असते. त्यांच्या प्रेमाची अनेक रूपे सातारकरांनी पाहिली आहेत. त्यांचे प्रेम कधी-कधी उतूपण जाते. ‘रयत’वर पवारसाहेब असल्याने त्या ठिकाणी माझी आवश्यकता नाही, अशा शब्दांत आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी टीकास्त्र सोडले. शरद पवार हे राजकारणातील अभ्यासू व्यक्‍तिमत्त्व आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ते कोणताही चुकीचा निर्णय घेणार नसल्याचे मतही त्यांनी व्यक्‍त केले.

सातारा नगरपालिकेत सुरु झालेल्या चुकीच्या कामांची जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी तक्रार केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आ. शिवेंद्रराजेंनी विविध प्रश्‍नांवर सडेतोड मते मांडली.

ते म्हणाले, उदयनराजेंच्या वाढदिवसानंतर त्यांचा फोन झाला नाही. खा. शरद पवार यांच्यासोबत हॉटेल प्रीतीपर्यंतच सैन्य होतं. सर्व आमदारांचा त्यांच्यावर विश्‍वास आहे. राजकारणातील अभ्यासू व्यक्‍तिमत्व असल्यामुळे ते कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीत. मी एबीआयटीमध्येच खूष आहे. दिल्‍लीतील वातावरण चांगले नसून सातार्‍यात लोकांना भेटता येते याचे समाधान आहे. राजधानी महोत्सवाला सुपरस्टार अमिताभ बच्चन आले नाहीत, असे विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, अमिताभ बच्चन का आले नाहीत याचे कारण सांगायला मी अभिषेक बच्चन नाही. त्यांच्या न येण्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी मुंबईला जावे लागेल, असेही ते म्हणाले.

सातारा पालिकेच्या कारभाराचाही आ. शिवेंद्रराजेंनी समाचार घेतला. ते म्हणाले, सातारा विकास आघाडीतील गटबाजीचा सातार्‍याच्या विकासावर परिणाम झाला आहे. नगराध्यक्षांनी रातोरात अजेंडा बदलला. सत्‍ताधार्‍यांचा नगरपालिकेत मनमानी व चुकीचा कारभार सुरु असून त्याचीच जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे. विकासकामांच्या आड राजकारण आणून विरोधी नगरसेवकांची कामे हाणून पाडली जात असल्याने विशेष सभा बोलावण्यात येणार आहे. सातारा नगरपालिकेत कुणाची मक्‍तेदारी नाही. जिल्हाधिकार्‍यांनी मागण्यांवर निर्णय न घेतल्यास नगरपालिका कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडणार,असा इशाराही त्यांनी दिला.

सातारा नगरपालिकेत सत्‍ताधारी आघाडीच्या मनमानी कारभारावर अंकुश रहावा तसेच चुकीच्या गोष्टींना आळा बसला पाहिजे.त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी विशेष सभा बोलवावी, अशी मागणी केली असल्याचे सांगून ते म्हणाले, नगरपालिका मतदारसंघातून जिल्हा नियोजन समितीवर काही नगरसेवक सदस्य म्हणून निवडून आले आहेत. पालकमंत्र्यांकडे मागणी केल्यावर नगरसेवकांना डीपीडीसीतून निधी देण्यात आला. संबंधित नगरसेवकांनी सुचवलेल्या कामांचा ठराव घेण्याचे जिल्हा नियोजन अधिकार्‍यांनी सातारा पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना कळवले.

नगरसेवकांनी सुचवलेले कामाचे विषय अजेंड्यावर घेतल्यानंतर नगराध्यक्षांनी रातोरात अजेंडा बदलला. विरोधात असलेल्या नगर विकास आघाडी तसेच भाजप नगरसेवकांचे विषय दुसरा अजेंडा काढून त्यातून वगळले. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांकडे दोन्ही बाजूच्या नगरसेवकांकडून तक्रार करण्यात आली. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. सातारा नगरपालिकेत महिन्याला सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक असताना दुर्लक्ष केले जात आहे. त्याची तक्रारही जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. विरोधात असलेल्या नगरसेवकांचे विषय अजेंड्यावर घ्यायचे नाहीत, त्यांची कामे करायची नाहीत अशा पध्दतीने सत्‍ताधारी आघाडीकडून विकासकामांमध्ये सूडाचे राजकारण केले जात आहे, अशी टीका आ. शिवेंद्रराजेंनी केली.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा नगरपालिकेत नविआचे 12 नगरसेवक विरोधात आहेत. एका प्रभागात सुमारे पाच हजार मतदार असतील तर 60 हजार मतदारांवर व उर्वरित हजारो नागरिकांवर सत्‍ताधारी आघाडी अन्याय करत आहे. भाजप नगरसेवकही विरोधात असल्याने त्यांच्या प्रभागातील लोकांवरही अन्याय केला जात आहे. लाखो लोकांना विकासापासून दूर ठेवले जात आहे. सातारा नगरपालिका कुणाच्या खाजगी मालकीची नाही. त्याठिकाणी कुणाचीही मक्‍तेदारी नाही, असे आ. शिवेंद्रराजेंनी ठणकावून सांगितले.

शुक्रवार पेठेतून नगरपालिकेवर जायचा विचार!
विधानसभा लढवणार की लोकसभा? खा. उदयनराजे यांच्याशी त्यांच्या वाढदिवसानंतर संपर्क झाला का? रयत शिक्षण संस्थेवर तुम्हाला घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे, असे प्रश्‍न आ. शिवेंद्रराजेंना विचारले असता, त्यांनी उपरोधिकपणे उत्तर दिले. मी शुक्रवार पेठेतून नगरपालिकेत निवडून जायचा विचार करतोय. लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही. सातारा-जावली मतदारसंघातच काम करणार असल्याचे ते म्हणाले.