Your Own Digital Platform

म्हसवडसह परिसरात पाऊसाची धो -धो


म्हसवड : नेहमीप्रमाणे यंदाही सुरुवातीला मान्सुन माण तालुक्याला फसवणार असेच चित्र संपुर्ण माण तालुक्यात असताना आज दुपारी शहर व परिसरात पाऊसाने धो धो हजेरी लावत सर्वांना दिलासा दिला. 

माण तालुका म्हटले की पाऊस येथे नेहमीच रुसलेला दिसुन येतो त्यामुळे येथिल पर्जन्यमान हे जिल्ह्यात सर्वात कमी असते मान्सुन सुरु झाला की जिल्ह्यात माण वगळता पाऊसाची चौफेर हजेरी असते माण तालुक्याला तसा नेहमी परतीचाच पाऊस पडतो त्यामुळे माण वासीयांनाही परतीच्याच पाऊसाची अपेक्षा असते, यंदाही तेच चित्र कायम राहिल असे वाटत असतानाच गुरुवार दि. २१ रोजी दुपारी शहर व परिसरात धो धो पाऊसाने हजेरी लावत यंदा आपण म्हसवडकरांसह संपुर्ण माण वासीयांना मनसोक्त दर्शन देणार असल्याचे जणु काही संकेतच दिले.
दरम्यान आज दुपारी कोसळलेल्या पाऊसामुळे शहरातील सर्व सेवा रस्ते हे जलमय बनले तर सर्व नाले, गटारी पाऊसाच्या पाण्याने खळखळुन वाहिली, सकाळपासुनच हवेमध्ये प्रचंड उकाडा जाणवत असल्याने आज पाऊस नक्की पडेल असेच जो -तो म्हणत असताना दुपारनंतर याठिकाणी पाऊसाने हजेरी लावली यामुळे काहीकाळ वाहणे रस्त्याकडेला उभी करुन पाऊसात प्रवास करण्याचा मोह अनेक वाहन चालकांनी टाळल्याने शहरात ठिकठिकाणी चारचाकी व दुचाकी पाऊसात ऊभी असल्याचे चित्र पहावयास मिळाले.