Your Own Digital Platform

पसरणी घाटात पत्नीसमोरच पतीचा खून
सातारा : पुण्याहून महाबळेश्‍वरला फिरण्यासाठी आलेल्या एका दाम्पत्यावर पसरणी घाटात शनिवारी दुपारी 3.15 वाजता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कोयत्याने हल्ला केला. पतीचा निर्घृणपणे खून करण्यात आला असून, या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. घटनेचे नेमके कारण समजू शकले नसून, संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला आहे.

आनंद ज्ञानेश्‍वर कांबळे (रा. औंध, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याची पत्नी दीक्षा आनंद कांबळे या जखमी झाल्या आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी, आनंद ज्ञानदेव कांबळे व दीक्षा आनंद कांबळे व राजेश बोबडे व कल्याणी बोबडे ही दोन जोडपी पुण्याहून महाबळेश्‍वरला पर्यटनासाठी इनोव्हा (क्रमांक एम. एच. 14 जी. एच 7071) गाडीतून जात होते. शनिवारी दुपारी या जोडप्यांची गाडी घाटात आल्यानंतर दीक्षा हिला उलट्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी गाडी थांबवली. यानंतर दीक्षा व आनंद हे एका बाजूला गेले. तर बोबडे दाम्पत्य हे गाडी घेऊन थोडे अंतरावर जाऊन फोटोसेशन करत होते. दीक्षा हिच्या उलट्या थांबल्यानंतर दीक्षा व आनंद हे एका कट्ट्यावर बसले होते. त्याचवेळी पाचगणीच्या बाजूने दोन दुचाकीवरून चौघे आले. त्यातील दोघांनी दीक्षाला पकडले. तर दोघांनी आनंदच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. ही घटना गाडीत बसलेले बोबडे दाम्पत्य पाहत होते. आनंदवर वार करून आणि दीक्षाला ढकलून या दोघांनी गाडीच्या काचेवर वार केले. काचेवर वार केल्यानंतर राजेश याने भीतीपोटी गाडी भरधाव वेगाने पाचगणी पोलिस ठाण्याकडे घेतली. राजेशने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मात्र, ती वाई पोलिसांची हद्द येत असल्याने वाई पोलिसांशी संपर्क साधला. आनंद रक्ताच्या थारोळ्यात पडला असताना एका खासगी वाहन चालकाने आपल्या गाडीत आनंद व दीक्षाला घेऊन ग्रामीण रूग्णालयात नेले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच आनंदचा मृत्यू झाला होता. दरम्यान, ही घटना घडताना प्रत्यक्षदर्शींनी दुचाकी क्रमांक पाहिला. याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली असून पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

आठ दिवसांपूर्वी झाला होता विवाह

आनंद कांबळे व दीक्षा कांबळे यांचा 26 मे रोजी विवाह झाला होता. उन्हाळी सुट्ट्या आणि नवीन दाम्पत्य असल्याने त्यांनी महाबळेश्‍वरला पर्यटनासाठी जाण्याचा बेत आखला होता. त्यानुसार ते शनिवारी महाबळेश्रला जातही होते. मात्र, रस्त्यातच पत्नी दीक्षा हिच्यासमोरच आनंदवर कोयत्याने वार केला गेला. आनंदचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. हे पाहूनच दीक्षाला मानसिक धक्का बसला. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळवण्यासाठी दीक्षा, राजेश व कल्याणी यांच्याकडे संवाद साधला मात्र, तिघांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. अवघ्या सात दिवसांच्या या संसाराचा असा करुण शेवट झाल्याने कुटुंबीयही हळहळले होते.