Your Own Digital Platform

पावसाच्या दडीमुळे शेतकरी हवालदिल


ढेबेवाडी : उन्हाळी पावसाची दमदार हजेरी आणि त्यानंतर मान्सूनची योग्य दिशेने वाटचाल असा अंदाज हवामान खात्याकडून सांगण्यात आल्यानंतर ढेबेवाडी विभागात सत्तर टक्क्याहून अधिक क्षेत्रावर भुईमूग, सोयाबीनसह खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र गेल्या आठवडाभरापासून पावसाने पूर्णपणे उघडीप घेतल्याने शेतकरी चिंतेत सापडला असून येत्या तीन ते चार दिवसात पाऊस न झाल्यास शेतकर्‍यांना दुबार पेरण्या कराव्या लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मान्सूनपूर्व पावसाचे दमदार आगमन झाले होते. त्यानंतर केरळमधून राज्याच्या दिशेने मान्सूनची योग्य दिशेने व गतीने वाटचाल सुरू आहे, असे सांगण्यात आले होते. त्यामुळेच जूनच्या पहिल्या आठवड्यात खरिपाच्या पेरणीस शेतकर्‍यांनी प्रारंभ केला होता. मात्र त्यानंतर पावसाने अचानक उघडीप दिली. तरीही जमिनीतील पेरणी योग्य ओलावा व वाफसा यावर अवलंबून रहात शेतकर्‍यांनी पेरण्या सुरूच ठेवल्या होत्या. मात्र त्यानंतर पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असा पाऊसच झालेला नाही. शेतकर्‍यांनी पेरण्या करू नयेत, असे आवाहन करायला कृषी खात्याने सुरूवात केली.

मात्र पेरण्या न थांबवता व काही अपवादात्मक क्षेत्र वगळता ढेबेवाडी विभागात जवळ जवळ 75 टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. पाटण तालुक्यातील काही विभागात भाताची आवटी व काही अपवादात्मक गावात काही प्रमाणात भुईमूग पेरणी वगळता अजून पेरण्या झालेल्या नाहीत. तर कराड तालुक्यातील तारूख, कुसूर कोळेवाडी व उंडाळे विभागात काही गावे वगळता बहुतांश ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मे महिन्याचा शेवटचा आठवडा व जूनच्या पहिल्या आठवड्यातले काही दिवस कमी अधिक प्रमाणात पडलेला पाऊस वगळता पावसाने उघडीपच दिली आहे. अजूनही लवकर पाऊस पडण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळेच केलेल्या पेरण्या वाया जाण्याच्या चिंतेने शेतकरी चिंतेत सापडल्याचे पहावयास मिळत आहे.