चांदण’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन


फलटण : साहित्य जीवनाचा अविभाज्य भाग असून माणसाला साहित्य जगण्याचे बळ देते. साहित्यातील काव्य हा अतिशय अवघड साहित्य प्रकार आहे. हजारात एखादा - दुसराकवी जन्माला येतो. काव्यप्रतिभा ही उपजत असावी लागते. यासाठी सृजनशिलता जागृत ठेवावी लागते. ‘चांदण’ काव्यसंग्रह प्रगल्भ विचारांचा ठेवा आहे, असे मत फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपक चव्हाण यांनी व्यक्त केले. 

इयत्ता 8 वी मध्ये शिकणारी येथील बालकवियत्री कु.रुपल राजेश पाटोळे हिच्या ‘चांदण’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन आ.चव्हाण यांच्या हस्ते येथील माळजाई मंदिर परिसरातील लायन्स क्लबच्या हॉलमध्ये संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रविंद्र येवले उपस्थित होते. यावेळी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, प्रगत शिक्षण संस्थेच्या संचालिका मंजिरी निंबकर, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, साहित्यिक ताराचंद्र आवळे, कवी प्रकाश सकुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आ.चव्हाण पुढे म्हणाले, रुपलच्या हातून साहित्य सेवा घडेल, ती सर्वगुणसंपन्न अशी कवियत्री ठरेल व नावारुपास येईल. ती फलटणची शांता शेळके ठरेल व फलटणचा नावलौकीक वाढवेल. तिचा हा काव्यसंग्रह टप्प्याटप्प्याने प्रगल्भ होत गेला असून ती चांदणीप्रमाणे चमचम करीत राहिल, अशा सदिच्छाही आ.चव्हाण यांनी व्यक्त केल्या.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्राचार्य रविंद्र येवले म्हणाले, माणसाची जडणघडण समाजात होते. व्रतस्थाप्रमाणे काम केले की यश हे निश्‍चित मिळते. अंतर्मुख करणार्‍या कविता रुपलच्या कवितासंग्रहात वाचायला मिळतात. सुंदर कार्य करण्यासाठी मुलांना चांगले संसकार देवून त्यांना समजून घेवूया. असे जर घडले तर सुदृढ समाज निर्माण होवून अनेक रुपल निर्माण होतील. 

श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर म्हणाल्या, आपण आभासी जगातून बाहेर पडून वास्तववादी जीवन जगले पाहिजे. मोबाईलचा कमी वापर करुन पुस्तके वाचली पाहिजेत. ‘चांदण’ काव्यसंग्रह साहित्याचा ठेवा आहे.
मंजिरी निंबकर म्हणाल्या, प्रगत शिक्षर संस्थेच्या शिक्षकांनी रुपलसारखी कवियत्री घडविणचे महान कार्यक ेले आहे. संवेदनशिलता व सरलतेने कवीतांची मांडणी तिने केली आहे. मानवी भावभावनांचा अविष्कार या काव्यसंग्रहात वाचायला मिळतो. 

ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी, खरे साहित्य आपल्या मातीत पहावयास मिळत असून या साहित्यिकांना न्याय मिळावा व राज्यपातीवर व्यासपीठ मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करुन कसदार साहित्य साहित्यिकांनी निर्माण करावे व फलटणचा नावलौकिक वाढवावा असे सांगितले.

यावेळी प्रकाश सकुंडे, शिवराज कदम, कवयित्री रुपल पाटोळे, अविनाश चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

प्रास्ताविकात ताराचंद्र आवळे यांनी काव्यसंग्रहाबद्दल विशेष कौतुक करुन काव्यसंग्रह वाचणार्‍यास चिंतन करावयास लावेल व फलटणच्या साहित्य क्षेत्रास रुपलच्या रुपाने चमचमती चांदणी मिळाली आहे असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमानंतर ज्येष्ठ कवी प्रकाश सकुंडे यांच्या अध्यक्षतेखाली काव्यमैफील झाली. यामध्ये निमंत्रित कवी अविनाश चव्हाण, अशोकराज दीक्षित, अनिल कोलवडकर, बालकवी सुयश आवळे, रविंद्र जंगम, तृप्ती रत्नपारखे, शाहीर प्रमोद जगताप यांनी बहारदार कवितांचे सादरीकरण करुन काव्यमैफिलीत रंग भरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र जगंम यांनी केले. आभार राजेश पाटोळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेखा आवळे, पुष्पा पाटोळे, सुदर्शन वेताळ, वनिता वेताळ, सिद्धांत निकाळजे, हर्ष निकाळजे, शालन कुचेकर, मालन खंडागळे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी साहित्यप्रेमी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.