कारवाईच्या धास्तीने मटण आणण्यासाठी डबे


सातारा : राज्य शासनाने प्लास्टिक बंदीची शनिवारपासून अंमलबजावणी केली असल्याने रविवारी सातारा शहरासह उपनगरातील बाजारपेठेत नागरिकांनी प्लास्टिक पिशवीला हद्दपार करत भाजीपाल्यासह अन्य साहित्यासाठी कापडी पिशव्यांचा वापर केला तर रविवार हा स्पेशल वार असल्याने मटण, चिकन, मासे नेण्यासाठी स्टिलच्या डब्यांचा सर्रास वापर झाला त्यामुळे नागरिकांमध्येही पर्यावरणाचा संदेश पोहोचला असल्याचे चित्र पहावयास मिळाले. व्यापार्‍यांनीही धास्ती घेत आपल्या दुकानातील प्लास्टिक पिशव्या टाकून दिल्याचे पहावयास मिळाले. 

राज्यात लागू केलेल्या प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीनंतर सातारा शहर व परिसरात शनिवारी मोठ्या प्रमाणात नगरपालिका प्रशासनामार्फत कारवाई करण्यात आली. दंड भरावयास लागू नये म्हणून अनेक कापड दुकानदारासह कर्मचार्‍यांनी दुकानातील प्लास्टिकच्या पिशव्या तातडीने काढून टाकल्या. रविवार हा बाजाराचा दिवस असल्याने सकाळी फिरायला गेल्यावर भाजी व फळ विक्रेत्यांकडून प्लास्टिकच्या पिशवीत भाजी व फळे घेवून येणार्‍या नागरिकांच्या हातात कापडी पिशव्या होत्या तर खरेदीसाठी बाहेर पडणार्‍या सातारकरांच्या हातात कागदी व कापडी पिशव्या सर्रास दिसत होत्या. एरवी मटणासाठी दुकानदारांकडून काळी पिशवी मागणार्‍या ग्राहकांनी आता डबे घेवून जात असतानाचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळाले. दंड भरावयास नको म्हणून प्रवासीदेखील कापडी पिशव्यांमध्ये सामान घेवून प्रवास करताना दिसत होते.

राज्य शासनाचा प्लास्टिक बंदीबाबतचा निर्णय पर्यावरण रक्षणासाठी आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी सर्वत्र शहर व परिसरातील नागरिकांची जनजागृती झाली असली तरी ग्रामीण भागात पाहिजे अशी जनजागृती झाली नाही. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच प्रदुषण नियंत्रण मंडळानेही या कायद्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे केल्यास निश्‍चितच प्लास्टिक आणि थर्माकोलमुक्त महाराष्ट्र या शासनाच्या अनोख्या उपक्रमाला यश मिळण्यास मदत होणार आहे.

डबे आणेल त्याला डिस्काऊंट

हॉटेल व्यावसायिकांनीही घरी पार्सल घेवून जाणार्‍या ग्राहकांनाही आता डबे घेवून येण्याची विनंती केली आहे. डबे असले तरच पार्सल मिळेल असे बोर्डही ठिकठिकाणच्या हॉटेल्स, धाबे, उपहारगृहामध्ये लागले आहेत.काही व्यावसायिकांनी शक्कल लढवत दंड होवू नये म्हणून 5 ते 10 टक्के डिस्काउंट डबे आणेल त्याला देण्यात येणार असल्याचे फलक लावले आहेत.

No comments

Powered by Blogger.