Your Own Digital Platform

देशहितासाठी समविचारी पक्षांशी चर्चा : पृथ्वीराज चव्हाण


कराड : भाजपा नेत्यांनी समाजात द्वेषाची भावना पसरवून केंद्रात सत्ता मिळवली. विकासापेक्षा घोषणाबाजी व जाहिरातींचे ढोंग जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच काँग्रेसने देशहितासाठी सर्वधर्मसमभावाची भावना बाळगणार्‍या समविचारी पक्षांशी चर्चा सुरू केली आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.वाठार (ता. कराड) येथे आ. चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून पूर्ण झालेल्या डिचोली ते शेणोली राज्यमार्गावरील वाठार - साजूर रस्त्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. आ. आनंदराव पाटील, राजेश पाटील-वाठारकर, अविनाश मोहिते, अजितराव पाटील-चिखलीकर, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, मंगल गलांडे, उत्तमराव पाटील, येरवळेचे सरपंच सुभाषराव पाटील, अ‍ॅड. नरेंद्र नांगरे-पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

आ. चव्हाण म्हणाले, तुमच्या सुरक्षेसाठी मला मतदान करा, असे सांगून नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपद मिळवले आहे. अजूनही देशातील जातीयतेचा विचार संपलेला नाही. सरकारकडून विकासापेक्षा जातीभेद अधारित राजकारणाला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे काँग्रेससारख्या पक्षाची सत्ता असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केले. सरपंच विलास पाटील यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

निधी कमी पडू देणार नाही....

निवडणुकीनंतर कधीच राजकीय मतभेद समोर ठेऊन आपण काम केले नाही. त्यामुळेच विरोधकांच्या गावातही निधी देत सर्वसामान्यांचे हित साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे वाठारसह परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.