Your Own Digital Platform

सातारा : निरा नदीचा परिसर झाला चकाचक


लोणंद (जि. सातारा) : सातारा जिल्हयाच्या सीमेतील निरा नदीवरील श्री दत्त घाट आणि महादेव घाट परिसर, निरा नदी काठची नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता मोहिमेसाठी दोन पोक लॅन्ड, पाच जेसीबी, पंधरा टॅक्‍टरसह सातारा, पुणे, सोलापूर जिल्हयातील सुमारे ८०० हुन अधिक स्वयंसेवकांचा समावेश होता.

निरा नदी आणि घाट परिसराच्या स्वच्छतेमुळे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील निरा नदीवरील माऊलींच्या पादुकांचा अभ्यंग स्नान सोहळा अतिशय सुलभ व सुखकर होणार आहे. या स्वच्छता मोहिमेचा उपक्रम आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. श्री दत्त घाटावर स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ खंडाळ्याचे तहसिलदार विवेक जाधव यांचे हस्ते प्रतिमापूजन करून करण्यात आले. यावेळी पाडेगावचे सरपंच हरिश्चद्र माने, विजय धायगुडे, ग्रामसेवक सुनिल धायगुडे, लक्ष्मणराव गोफणे, डॉ. वसंतराव दगडे, सुजाता दगडे आदी मान्यवर उपस्थित होते.या स्वच्छता मोहिमेत पाडेगाव व निरा या दोन्ही काठच्या परिसरासह रेल्वे पूल ते रस्ता पुलासह संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत घाटातील जलपर्णी, प्लॅस्टिक आणि कचऱ्याच्या पंचवीस ट्रॉली बाजूला काढण्यात आल्‍या.