धूम बायकर्समुळे व्यावसायिकाचा मृत्यू


सातारा : राजपथावरील वाहतूक पोलिस विभाग ते सयाजी हायस्कूल परिसरात रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात राजन चंपकलाल शहा (वय 57, रा. प्रतापगंज पेठ) यांचा मृत्यू झाला. बेदरकार दुचाकीची धडक बसल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे घटनास्थळी पाहणार्‍या नागरिकांनी सांगितले. दरम्यान, वेगवान कटने निष्पाप जिवाचा बळी घेतल्याने धूम बायकर्सविरोधात संतापाची लाट उसळली आहे. जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी सर्व पोलिस ठाण्यांमध्ये सक्‍त सूचना देऊन, अशा मस्तवाल पोरांना शोधून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी सातारकरांनी केली आहे.याबाबत माहिती अशी, रविवारी रात्री राजन चंपकलाल शहा दुचाकीवरून पोवई नाक्याकडे निघाले होेते. दुचाकी वाहतूक विभाग ते सयाजी हायस्कूल या परिसरात असताना हा अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती की, राजन शहा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी धूम बाईकवरील युवकही रस्त्याच्या बाजूला पडलेला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र राजन शहा यांचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यू झाला.

दरम्यान, संदेश आत्माराम गिरमे (वय 23, रा.शाहूपुरी मूळ रा. कुसखुर्द, परळी) असे दुसर्‍या दुचाकीवरील युवकाचे नाव आहे. त्याच्याकडे स्प्लेंडर दुचाकी होती. या दुचाकीला मात्र पुढे व पाठीमागे क्रमांकही नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या दुर्घटनेत संशयित आरोपी संदेश गिरमे किरकोळ जखमी झाला असून सहाय्यक फौजदार आर.के.पवार पुढील तपास करत आहेत.अपघात झाल्यानंतर मुख्य रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार धडक देणारा युवक हा धूम स्टाईलने दुचाकी चालवत होता. वेडीवाकडी वळणे घेत असतानाच राजन शहा यांच्या दुचाकीला कट मारताना त्याची दुचाकी धडकली व त्यातच अपघात झाला. अपघातानंतर उपस्थित नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद झालेली आहे. मृत राजन शहा यांचे मेडीकल असून ज्येष्ठ पत्रकार चं. ने. शहा यांचे चिरंजीव व जोतीषतज्ञ प्रा. रमणलाल शहा यांचे पुतणे होते. तसेच त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

No comments

Powered by Blogger.