सातार्‍यात विद्यार्थ्यांना बसतोय आर्थिक भुर्दंडसातारा : शहरातील शाळा दि. 15 जूनपासून सुरू झाल्या आहेत. ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्याने शहरातील विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्‍न जटील झाला असून पोवई नाका ते राजवाडा या मार्गावर रिक्षा व बस वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यासाठी सातारच्या गल्लीबोळाचे दर्शन घ्यावे लागत आहे. या मार्गावरुन प्रवास करणार्‍या हजारो विद्यार्थ्यांकडून वाहतूक भाडे जादा आकारले जात असून पालकांना महिन्याला मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.छत्रपती शाहू (थोरले) महाराज यांनी 18 व्या शतकात सातारा शहर वसवले. व्यापार व रहदारीसाठी दोन रस्त्यांची निर्मितीही त्याच वेळी करण्यात आली. यावेळी राजवाड्याची मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळख होती पण आताच्या काळात शहराचा विस्तार चारही बाजूला झाला आणि पोवई नाका हे शहराचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून उदयास आले. पोवई नाका हे सातारचे नाक असल्याचे म्हटले जाते. ज्या पद्धतीने नाक दाबल्यावर गुदमरले जाते त्याप्रमाणे ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे वाहतुकीच्या दृष्टीने सातारा शहर गुदमरले गेले आहे.

शासकीय व इतर ऑफिस पोवईनाकाच्या पूर्वेकडे आणि शहर (जुना सातारा) पश्‍चिमेकड आहेे. दीर्घकाळ चालणार्‍या ग्रेड सेपरेटरच्या या कामामुळे सहजपणे दळणवळण करणे जिकीरीचे झाले आहे. त्यातच शहरातील सर्व शाळा सुरु झाल्या आहेत. शहर विस्तारले तरीही प्राथमिक, माध्यमिक शाळा या नाक्याच्या पश्‍चिमेस आहेत. महाराजा सयाजीराव विद्यालय, भिमाबाई आंबेडकर, जिजामाता विद्यालय, भवानी हायस्कूल, कन्या शाळा, न्यू इंग्लिश स्कूल, प्रतापसिंह हायस्कूल, अनंत इंग्लिश मिडीयम, चिपळूणकर या सर्व शाळा शहराच्या पश्‍चिमेकडे आहेत.

पोवई नाक्याच्या पूर्वेस अगदी कृष्णानगर, संगमनगर, संगम माहुली, क्षेत्र माहुली, देगांव, एमआयडीसी, वाढे फाटा, नागठाणे, उंब्रज, अतीत यासह इतर ठिकाणाहून विद्यार्थी सिटी बस, रिक्षा, पालकांच्या वाहनावर अथवा सायकलवर येतात. त्यातच मुलींना अहिल्याबाई होळकर मोफत बस सेवा असल्याने त्या सर्रास बसचा वापर करतात. परंतु सध्या ग्रेड सेप्रेटरच्या कामामुळे नाक्यावरुन राजवाड्याकडे जाणारी बससेवा बंद करण्यात आली आहे. रिक्षावाले नाका-राजवाडा किंवा बस स्टॅन्ड-राजवाडा हे भाडे जादा घेत आहेत. तेव्हा आता विद्यार्थ्यांनी शाळेत यायचं कसं? त्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांसाठी जादा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

अंतर वाढल्याने फटका...


रिक्षाचा वाहतुकीचा पूर्वीचा दर सामान्यत: 30 रुपये होता तो ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे आणि महागाईमुळे आता 42 रुपये झाला आहे. त्यात आता 4 किलोमीटर अंतर वाढले असून 12 रुपये जादा भुर्दंड पडला आहे. तसेच सिटीबसचा पूर्वीचा दर 10 रुपये होता तो डिझेल वाढ, कामगार पगार वाढ प्रश्‍न सांगून 15 रुपयांवर गेला असून 6 किलोमीटर अंतर वाढले आहे.

No comments

Powered by Blogger.