Your Own Digital Platform

खाजगी शाळेकडुन गणवेश, वह्या पुस्तके घेण्याची पालकांना सक्ती


म्हसवड  :पुढील अठवड्यापासुन नवीन शैक्षणीक वर्ष सुरु होत असल्याने आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे यासाठी पालकांची धावपळ सुरु असुन पालकांच्या याच धावपळीचा फायदा घेण्यासाठी शहरातील एका नामांकित खाजगी शाळेने नवा उद्योग सुरु केला असुन आपल्या पाल्याला जर आमच्या शाळेत प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला लागणारे सर्व शैक्षणीक साहित्य गणवेश हा आमच्याच शाळेतुन खरेदी करावा लागेल असा फतवाच संबधीत खाजगी शाळेने काढुन पालकांची अर्थिक लुट सुरु केली आहे, यावरुन म्हसवड सह परिसरातील पालकवर्गातुन संबधीत शाळेबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटु लागल्या आहेत.

आपला पाल्य शिकावा त्याला चांगले शिक्षण मिळावे यासाठी पालकांची नेहमीच धावपळ सुरु असते सध्याचे दिवस हे महागाईचे दिवस असल्याचे सर्वच स्तरातुन बोलले जाते तरीही प्रसंगी आपल्या पोटाला चिमटा घेवुन कित्येक पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी धडपडत असतात, पुढील अठवड्यापासुन नवीन शैक्षणीक वर्ष सुरु होत असल्याने आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे त्यासाठी त्याला चांगल्या शाळेत शिक्षणासाठी प्रवेश मिळावा यासाठी सर्वच पालक प्रयत्न करीत असतात, शासनाच्या लवचिक शैक्षणीक धोरणांमुळे सध्या सर्वच ठिकाणी खाजगी शाळेचे पेव फुटले आहेत, या खाजगी शाळांनी नवीन शैक्षणीक धोरणांचा फायदा उठवत गुणवत्तेचा नुसता भपका निर्माण केला असुन आमचीच शाळा कशी इतर शाळेपेक्षा आदर्श व गुणवत्तेत अव्वल आहे हे भासविण्याचा नसता उद्योग सुरु केला आहे, शाळांच्या या भपकेबाजीमुळे खरेतर शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे याचा विसर संबधीत शाळांना व पालकांनाही पडला आहे, आतातर आमचीच शाळा सर्वात नं. १ असल्याचे भासवण्यासाठी शहरातील एका खाजगी शाळेने विद्यार्थ्यांना लागणारे संपुर्ण शैक्षणीक साहित्य बेकायदेशीर रित्या शाळेतच विक्रीस ठेवले असुन ते खरेदी करण्यासाठी पालकांना सक्ती केली आहे, जर तुमचा पाल्य आमच्या शाळेत शिकणार असेल तर आमच्याच शाळेतुन त्याला लागणारे साहित्य खरेदी करावे लागेल असा एकप्रकारे फतवाच संबधीत खाजगी शाळेने काढल्याने शिक्षणाचा अक्षरशा बाजार झाल्याचे मत अनेक तन्यांकडुन व्यक्त होत आहे.

संबधीत शाळेने विक्रीस ठेवलेल्या वस्तु ह्या बाजारपेठ निम्या दराने मिळत असताना त्या केवळ शाळेच्या सक्ती मुळे दुप्पट किमतीने पालकांना नाईलाजाने खरेदी कराव्या लागत असुन शाळेने सुरु केलेली ही दुकानदारी बंद करावी अशी मागणी आता पालक वर्गातुन व्यक्त होवु लागली आहे. 

कोणतेही शाळा ही विद्येचे मंदिर मानली जाते त्याठिकाणी विद्यार्थ्यांना न्यानदानाचे शिक्षण देण्याचे पवित्र काम चालते अशा या पवित्र मानल्या जाणार्या मंदिरात पाल्याच्या आडुन पालकांची सुरु असलेली अर्थिक लुट ही विद्या मातेच्या नावाला काळीमा फासणारी असुन ही लुट थांबणे गरजेचे आहे तरच आजच्या महागाईच्या जमान्यात सामान्य पालक आपल्या पाल्याला चांगले ? शिक्षण देवु शकेल. 

एकीकडे कोणतेही मुल हे शाळेबाहेर राहु नये यासाठी शासन लाखो रुपये खर्च करुन शालाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहे, तर याच शासनाने बनवलेल्या शैक्षणीक नियमावली पायदळी तुडवुन काही खाजगी शाळा आपल्या अर्थिक तुंबड्या भरत आहेत याला कोठेतरी चाप लागावा यासाठी शासनानेच कृती करावी व अशा शाळांची मान्यताच रद्द करावी अशी मागणी पालकवर्गातुन होत आहे.


गत वर्षी म्हसवड मधील याच खाजगी शाळेने दाखल्यांसाठी पालकांची अर्थिक लुट केल्याची तक्रार आमच्याकडे आल्यावर आम्ही संबधीत शाळेला भेट देवुन संबधीत प्राचार्यांना याविषयी जाब विचारत असे प्रकार पुन्हा घडल्यास शाळाविरोधात मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देताच संबधीत शाळेने दाखल्यांसाठी घेतलेले पैसे पालकांना परत केले होते. आताही शाळेने सुरु केलेल्या दुकानदारी संदर्भात पालकांच्या तक्रारी आल्यास संबधीत शाळेला मनसेचा हिसका दाखवुन देवु.

-धैर्यशील पाटील - जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सातारा.

आपल्या देशाची ज्याप्रमाणे खुली अर्थव्यवस्था आहे त्याप्रमाणेच खुली बाजारपेठ आहे त्यामुळे कोणी कोठेही खरेदी करु शकतो त्यासाठी आपण कोणालाही सक्ती करु शकत नाही, संबधीत शाळेने विद्या दानाचे काम करावे त्याठिकाणी वस्तुंची विक्री करुन शाळेचे दुकान करु नये तर सक्ती तर अजिबातच करु नये अन्यथा पालकांना सोबत घेवुन आम्हाला संबधीत शाळाविरोधात रस्त्यावर उतरावे लागेल.

-नितीन दोशी - माजी नगराध्यक्ष म्हसवड नगरपरिषद म्हसवड.