पं. स.मधील बोगस फिरतीचे प्रमाण वाढले


सातारा : जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांमधील बरेच कर्मचारी सातारा येथून ये-जा करत असल्याने अनेक लेटलतीफ व बोगस फिरत्या दाखवून पंचायत समित्यांमध्ये दांड्या मारत आहेत. अशा कर्मचार्‍यांची संख्या वाढली असल्याने त्यांच्या सेवा अन्य तालुक्यात वर्ग करून त्यांच्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाईचा दंडूका उभारावा, अशी मागणी अधिकारी व कर्मचार्‍यांमधून जोर धरू लागली आहे.संंबंधित कर्मचारी एखाद्या विषयाची माहिती देणे, किरकोळ टपाल आदी कामासाठी शिपाई असताना देखील कनिष्ठ, वरिष्ठ सहाय्यक बोगस फिरती दाखवून कार्यालयात उपस्थित रहात नाहीत तसेच पंचायत राज सेवार्थमधून वेतन बिलांच्या कामाकरता काही कर्मचारी महिन्यातून 4 ते 5 वेळा सातारा येथे फिरत्या दाखवून गैरहजर रहात आहेत. याचे सर्वाधिक प्रमाण जावली व महाबळेश्‍वर पंचायत समितीमध्ये दिसून येते.

या कार्यालयातील बरेच कर्मचारी आठवड्यातून फक्‍त 2 ते 3 दिवसच कार्यालयात उपस्थित असतात. बायोमेट्रीक पंचिंग मशिन्स बंद असल्याने किंवा त्याचा अहवाल दरमहा काढले जात नसल्याने लेटलतीफ व कामचुकार कर्मचार्‍यांच्या उपस्थिती व फिरत्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने कर्मचारी सैराट झाले आहेत.गटविकास अधिकारीही मुख्यालयी रहात नसल्याने ते कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. बहुतांश गटविकास अधिकारी सातारा येथून शासकीय वाहनाने ये जा करीत असल्याने आठवड्यातून एक दोन दिवसच कार्यालयात उपलब्ध असतात. त्यामुळेच कर्मचारी बिनधास्त आहेत. दुसर्‍या व चौथ्या शुक्रवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या आदल्यादिवशी दुपारनंतर कर्मचारी गायब होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तरी सर्व पंचायत समितीत बायोमेट्रीक पंचिग मशिन्स सुरू करून त्या अहवालानुसार प्रत्यक्ष कार्यवाही करून कर्मचार्‍यांचे उपस्थितीवर व बोगस फिरत्या नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात कराड, पाटण, खटाव व फलटण हे तालुके तुलनेने मोठे असुनही तेथील कर्मचार्‍यांची संख्या इतर लहान तालुक्यातील कर्मचार्‍यांएवढीच किंवा त्यापेक्षा कमी आहे, काही पदे रिक्त आहेत त्यामुळे महाबळेश्‍वर, खंडाळा, जावली इत्यादी लहान तालुक्यातील काम कमी असलेल्या कर्मचार्‍यांची सेवा मोठ्या तालुक्यातील अपूर्ण व प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी घेता येईल.फलटण, खटाव, कराड व पाटण पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकार्‍यांना प्रचंड काम आहे, मात्र त्या तुलनेत कर्मचारी वर्ग अपुरा आहे. तशीच अवस्था इतरही विभागात आहे. त्यामुळे अपुर्‍या कर्मचारी वर्गामुळे कामे प्रलंबित राहण्याचे प्रमाण मोठ्या तालुक्यात जास्त आहे. तरी लहान तालुक्यातील ज्या कर्मचार्‍यांच्या फिरत्या अधिक आहेत तसेच जे कर्मचारी सातत्याने उशीरा येवून लवकर जात आहेत किंवा वारंवार रजा उपभोगत आहेत त्यांच्या कामाचा आढावा घेवून त्यांना काम कमी आहे, असे समजून त्यांच्या सेवा अन्य मोठ्या तालुक्यात वर्ग करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.

No comments

Powered by Blogger.