Your Own Digital Platform

गौरी लंकेश यांच्या मारेकर्‍यांचा सातार्‍यात मुक्काम


सातारा : कर्नाटक राज्याच्या ज्येष्ठ महिला पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे थेट सातारा शहरापर्यंत आले असून, याप्रकरणी बंगळूरच्या पोलिसांनी कोडोली येथे छापा टाकून सुमारे 7 तास कार्यवाही केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील काही संशयितांनी सातार्‍यात काही काळ मुक्काम केल्याचे समोर येत असून, या घटनेने सातारा हादरला आहे. दरम्यान, ‘अंनिस’चे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर हे दुसरे कनेक्शन सातार्‍यापर्यंत आल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे.

दि. 5 सप्टेंबर 2017 रोजी गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी अज्ञातांनी बेछूट गोळीबार करून हत्या केली होती. गौरी लंकेश या ‘लंकेश पत्रिका’ हे साप्ताहिक चालवत होत्या. या माध्यमातून ज्वलंत विषयांसह बेधडक त्यांचे लिखाण होते. त्यांच्या हत्येनंतर पत्रकारिता क्षेत्रासह, बेंगलोर व संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. विचारवंतावर भ्याड हल्ला झालेली अलीकडील देशातील ही चौथी घटना आहेे. गेल्या चार वर्षांत सातारचे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची पुणे, कोल्हापूरचे कॉ.गोविंद पानसरे यांची कोल्हापूर, एम.एम.कलबुर्गी यांची कर्नाटक येथे तर 2017 मध्ये गौरी लंकेश यांची घराजवळच हत्या झालेली आहे.

गौरी लंकेश यांना लक्ष्य करत त्यांची हत्या केल्यानंतर कर्नाटक सरकारपुढे मोठे आव्हान निर्माण झाले. बेंगलोर, कर्नाटक पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर गेल्या आठ दिवसांत याप्रकरणाच्या तपासात प्रगती झालेली आहे. पुणे येथून काही संशयितांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे चौकशीला सुरुवात करण्यात आली. या चौकशीत एकाने गौरी लंकेश यांची हत्या केल्यानंतर काही दिवसांसाठी सातारा येथे मुक्काम ठोकल्याचे समोर आले आहे.

बेंगलोरचे विशेष तपास पथक (एसआयटी) पोलिस या प्रकरणाचा अत्यंत गोपनीय तपास करत असून गौरी लंकेश यांच्या हत्येच्या अनुषंगाने दि. 29 मे रोजी हे तपास पथक सातार्‍यात आले होते. सकाळी 10 वाजता हे पथक आल्यानंतर दुपारी पाच वाजेपर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार कोडोली येथे बेंगलोर पोलिसांची एक ट्रॅव्हलर व्हॅनच आली होती. या पथकामध्ये बेंगलोरचे सुमारे 12 पोलिस अधिकारी कर्मचारी होते. पोलिसांनी कोडोली येथे एका घरावर छापा टाकल्यानंतर या घटनेमुळे परिसरात काहीकाळ गोंधळाचे वातावरण होते. दुपारी उशीरापर्यंत परराज्यातील हे पोलिस असल्याचे लक्षात आल्यानंतर काही स्थानिकांनी पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र भाषेच्या अडचणीमुळे त्यांच्याशी संवाद साधता आला नाही.

बेंगलोरच्या या पोलिसांसोबत दोन संशयित आरोपीही सोबत असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित संशयित आरोपीचे इतर सहकारी सातार्‍यात संबंधित फ्लॅटमध्ये काही दिवसांसाठी राहत होते. सुमारे 20 ते 25 दिवस राहिल्यानंतर मात्र ते तेथून निघून गेले. दरम्यान, गौरी लंकेश यांच्या मारेकर्‍यांनी सातार्‍यात वास्तव्य केल्याचे समोर येत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गौरी लंकेश यांच्या हत्येतील नेमका किती जणांनी सातार्‍यात मुक्काम केला? संशयित मारेकरी सातार्‍यात कोणाच्या ओळखीने आले होते? हत्येनंतर ते नेमके कधी आले होते? सातार्‍याशी याप्रकरणात आणखी कोणती लिंक आहे? असे अनेक शक्यता तपासल्या जात आहेत.

स्थानिक पोलिस अनभिज्ञ

सातार्‍यात मे महिन्यात बंगळूरचे पोलिस आले होते, हे सत्य आहे. पोलिस दलातील काही पोलिस अधिकार्‍यांकडे याबाबत माहिती घेतली असता, बंगळूरचे पोलिस सातार्‍यात आल्याबाबतची त्यांना कोणतीही माहिती नव्हती. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील या हत्यासत्रामुळे पोलिसांसमोरही मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. अशा हत्यांच्या तपासासाठी पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आल्याने स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती नसते. यामुळे या पथकाने छापा टाकल्यानंतर स्थानिक पोलिसांनाही पुसटशी कल्पना येत नाही. हीच परिस्थिती सातारा पोलिसांच्या बाबतीत असण्याची शक्यता आहे.

गोळीबाराचे प्रशिक्षण नेमके कुठे झाले?


गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात हल्ला केल्यानंतर संशयित काही दिवस सातार्‍यात राहिले होते. मात्र, हत्येपूर्वी ते सातार्‍यात राहिले होते की नव्हते, याबाबत शंका असून पोलिसांचा तपास सुरूच आहे. प्राथमिक माहितीनुसार मात्र हल्लेखोरांना हल्ला करण्यापूर्वी बंदूक व गोळीबार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. हे प्रशिक्षण दोन ठिकाणी देण्यात आले असून, बेळगाव व सातारच्या नावाची चर्चा आहे. यामुळे ही बाब गंभीर असून, तसे असल्यास स्थानिक पोलिसांनीही याबाबत चौकशी, तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण, गेल्या काही वर्षांपासून सातारा शहरासह जिल्ह्यात शस्त्रांची सर्रास तस्करी सुरू आहे. दुर्दैवाने मात्र शस्त्र पकडल्यानंतर त्याची लिंक पुढे सरकत नाही. सातार्‍यात शुल्लक कारणातूनही आता फायरिंग होऊ लागले आहे. यामुळे बंदुकीचे हे कनेक्शन दखलपात्र आहे.