Your Own Digital Platform

प्लास्टिक विक्रेत्यांना ४० हजारांचा दंड


सातारा : राज्य शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकचा सर्रास वापर करणार्‍या व्यापारी पेठांतील विक्रेत्यांवर सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दंडुका उगारला. सदाशिव पेठ, गुरुवार पेठ, मोती चौक, रविवार पेठ या भागात 8 विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून बंदी घातलेले 70 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. त्यांना प्रत्येकी 5 हजारांप्रमाणे 40 हजारांचा दंड करण्यात आला.प्लास्टिकमुळे आरोग्यावर होणारा परिणाम आणि त्याचबरोबर वाढत जाणारा कचरा या भयंकर समस्या निर्माण झाल्याने राज्य सरकारने प्लास्टिकच्या ठराविक वस्तूंवर बंदी आणली. पूर्वी 50 पेक्षा कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक वापर बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्याची फारशी अंमलबजावणी झाली नाही. 

सातारा नगरपालिकेने तर संपूर्ण प्लास्टिक बंदीचा ऐतिहासिक ठराव घेतल्यानंतरही शहरात प्लास्टिक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत होता. कायदा असूनही तो राबवला जात नसल्यामुळे सरसकट प्लास्टिक पिशव्या वापरल्या जात होत्या. राज्य शासनाने ठराविक शेती, औषधे अशा आवश्यक व गरजेच्या गोष्टी वगळता उर्वरित सर्व प्लास्टिकवर बंदी घातल्याने मोठ्या प्रमाणावर चाप बसणार आहे. याबाबत शासनाने पूर्वीचा प्लास्टिक पिशव्यांचा साठा नष्ट करण्यासाठी दिलेली मुदत संपली. त्यानंतर शनिवारपासून प्लास्टिकबंदी करण्यात आली. 

सातारा पालिकेच्या आरोग्य विभागातील भाग निरीक्षकांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी पेठा, मंडई विभागांमध्ये कारवाई करुन सुमारे 70 किलो प्लास्टिक जप्त केले. 8 जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून प्रत्येकी 5 हजाराप्रमाणे 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. राजेखान बादशहा आत्तार यांच्या बुधवार पेठेतील चिकन दुकानातून प्लास्टिक पिशव्यांची 3 पॉकेट जप्त करण्यात आली. आशा राजू कारंडे यांच्या सदाशिव पेठेतील दुकानातून प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. आकाश वसंतराव बेंद्रे यांच्या गुरुवार पेठेतील दुकानातून प्लास्टिक पिशव्या व बंदी घातलेले थर्माकॉल ताब्यात घेण्यात आले. मोमीन ब्रदर्स यांच्या रविवार पेठेतील दुकानातून प्लास्टिक ग्लास, पिशव्या व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. तपासे यांच्या शू किंग दुकानातून 100 पिशव्या जप्त केल्या. 

 नवशाद हरी पलाई यांच्या डिलाईट बेकर्स, मिथुन शिंदे यांच्या न्यू पुना बेकरी या दुकानांमधूनही मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक ताब्यात घेण्यात आले. रवींद्र उत्तम कांबळे यांच्या दुकानात प्लास्टिक पिशव्या, ग्लास तसेच हलक्या प्रतीचे बंदी घातलेले प्लास्टिक जप्त करण्यात आले. कारवाईवेळी अनेक ठिकाणी संबंधित विक्रेते तसेच दुकानदार आणि नगरपालिका अधिकारी यांच्यात वादावादी झाली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. दबावाला बळी न पडता संंबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे, भाग निरीक्षक दत्तात्रय रणदिवे, प्रविण यादव, गणेश टोपे यांनी ही कारवाई केली. दरम्यान, केवळ गरीबांवर कारवाईचा बडगा न उगारता छोटा मोठा भेदभाव न करता व्यापारी पेठेतील मोठ्या विक्रेत्यांवरही कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.