Your Own Digital Platform

गुंड दत्ता जाधवचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार


सातारा : प्रतापसिंहनगरमधील कुख्यात गुंड व सध्या मोक्काखाली अटक असलेल्या दत्ता जाधव याने एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन पुणे येथील लॉजवर नेऊन तीनवेळी अत्याचार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून सातारा शहर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी स्वत: त्या पीडित मुलीने तक्रार दिली असून ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपातही केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या घटनेने सातार्‍यात खळबळ उडाली असून मोक्कांतर्गत असलेल्या गुंड दत्ता जाधव याच्याविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या प्रकरणातील पीडित मुलगी अवघ्या 13 वर्षांची आहे. पीडित 13 वर्षीय मुलीच्या आईला दत्ता जाधवने ‘तुमची मुलगी मला खूप आवडते. ती मला दे, मला दिली नाही तर तिला दुसर्‍या कोणाला मिळून देणार नाही, तिला बरबाद करेन,’ अशी धमकी दिली. त्यानंतर दि. 1 डिसेंबर 2017 रोजी संशयित गुंड दत्ता जाधव याने संबंधित मुलीला शाळेत जात असताना स्कॉर्पिओ कारमध्ये बसवून तिला कपडे खरेदी करायला पुणे येथे नेले.

अल्पवयीन मुलीला गाडीत घालून नेल्यानंतर गुंड दत्ता जाधव याने एका लॉजवर तिच्यावर तीन वेळा अत्याचार केला. परत त्या मुलीला घरी नेवून सोडले. दरम्यान, या घटनेत ती मुलगी गर्भवती राहिली. यामुळे त्याने सातार्‍यातील एका डॉक्टरकडे नेवून गर्भ राहिला आहे का? हे तपासले असता ती गर्भवती असल्याचे समोर आले. गुंड दत्ता जाधव याने डॉक्टरला हाताशी धरून तिचा गर्भपात केला. ही सर्व घटना झाल्यानंतर याची माहिती कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तक्रारदार मुलीने तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, पीडित मुलीसह तिच्या कुटुंबियांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून घडलेल्या सर्व घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटना ऐकून घेतल्यानंतर त्या कुटुंबियांना धीर दिला. गुन्हा दाखल करुन घेवून मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेचा पुढील तपास पोनि नारायण सारंगकर आहेत.

गुंड दत्ता जाधव याच्याविरुध्द अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. नुकतेच त्याला मोक्काअंतर्गत अटक केलेली आहे. मोक्का लागल्यानंतर गुंड दत्ता जाधव पसार झाला होता. त्याच्या शोधासाठी सांगली व सातारा येथील पोलिसांचे एक पथक जत येथे गेले होते. त्यावेळी दत्ता जाधव नाट्यमयरित्या पळून गेला. या घटनेनंतर मात्र लगेचच त्याला सातारा पोलिसांनी प्रतापसिंहनगर येथून अटक केली. अटक केल्यानंतर त्याला प्रतापसिंहनगर येथून चालवत पोलिस ठाण्यापर्यंत आणले होते. सावकारी, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल असताना आता अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचाही त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. सातार्‍यात या घटनेने खळबळ उडाली असून दत्ता जाधव विरोधात संतापाची लाट उसळली आहे.

सातार्‍यातील तो डॉक्टर कोण?

प्रतापसिंहनगरमधील गुंड दत्ता जाधव याने पीडित मुलगी गर्भवती राहिली असल्याचे समोर आल्यानंतर त्याचा बभ्रा होऊ नये, यासाठी काळजी घेतली. मुलीला सातार्‍यातील एका डॉक्टरकडे तो तपासणीसाठी घेऊन गेला. यावेळी डॉक्टरने ‘प्रेगा न्यूज’द्वारे तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समोर आले. त्यानंतर दत्ता जाधव व त्या डॉक्टरचे बोलणे झाल्यानंतर मुलीला रक्तवाढीच्या गोळ्या देतो, असे सांगून औषध दिले. ते औषध खाल्ल्यानंतर मात्र मुलीला रक्तस्त्राव झाला व त्यात तिला कमालीचा त्रास झाला. अशा पद्धतीने त्या मुलीचा गर्भपात झाला असल्याचे समोर येत आहे. यामुळे सातार्‍यातील तो डॉक्टर कोण? पोलिस याप्रकरणी त्या डॉक्टरवर कोणती कारवाई करणार? याकडे आता लक्ष लागले आहे.