Your Own Digital Platform

मोदी, फडणवीस.. ढिश्कॅवऽ ढिश्कॅवऽऽ


सातारा : सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी, कष्टकरी यांच्यापुरताच आत्महत्येचा विषय मर्यादित न राहता सर्वसामान्यांमध्येही आत्महत्येची मानसिकता निर्माण होऊ लागली आहे. सरकारने तातडीने पावले उचलून उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. दरम्यान, आनगुडगुडे नालगुडगुडे मोदी सरकार.. ढिश्कॅवऽ ढिश्कॅवऽऽ, आनगुडगुडे नालगुडगुडे फडणवीस सरकार डिश्कॅवऽ ढिश्कॅवऽऽ, आनगुडगुडे नालगुडगुडे भाजप सरकार ढिश्कॅवऽ ढिश्कॅवऽऽ अशा जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. पेट्रोल पंपाच्या प्रतिकृतीची अंत्ययात्रा काढली. राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडल्यानंतर पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. 

सातत्याने इंधन दरवाढ होत असल्याच्या निषेधार्थ पदाधिकार्‍यांनी वाहनातून आणलेल्या पेट्रोलपंपाच्या प्रतिकृतीची अंत्ययात्रा काढली. इंधन दरवाढीचा राग व्यक्‍त करत कार्यकर्त्यांनी ही प्रतिकृती रस्त्यावर तुडवली. यावेळी प्रतिकृती जाळण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी हस्तक्षेप केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, भाजप-सेनेचे युती सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. पोकळ आश्‍वासने देवून लोकांची फसवणूक केली. शेतकरी, कष्टकरी, कामगार, व्यवसायिक, शिक्षक अशा सर्वच घटकांमध्ये सरकारबद्दल तीव्र असंतोष आहे. नोटबंदी, जीएसटी लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या आततायीपणामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. सामाजिक विचारांची हत्या, फसवी कर्जमाफी, शिक्षणाचा बाजार, थकित शिष्यवृत्‍ती, वाढती बेरोजगारी आदि समस्यांनी सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातील खाजगी क्षेत्रातील विशेष कार्य अधिकार्‍यांनी राज्याचे प्रशासनच ताब्यात घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्याच्या गरजेनुसार आवश्यक असणार्‍या विषयांना प्राधान्य न देता बुलेट ट्रेन, समृध्दी मार्ग यांसारख्या अवाढव्य योजनांना मोठ्या प्रमाणात महसूल वळवला जात आहे. सर्व क्षेत्रात कोंडी होत असलेले नागरिक आत्महत्येस प्रवृत्‍त होतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील साखर उद्योग अडचणीत असताना पाकिस्तानमधून साखर आयात करुन शेतकर्‍यांची फसवणूक केली जात आहे. गेली सोळा दिवस पेट्रोल व डिझेलचे दर दररोज वाढत असून सामान्य जनता त्यामुळे त्रस्त झाली आहे. इंधनदर कमी करण्यासाठी सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. सरकारच्या अनागोंदी कारभाराचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात येत आहे. मागण्यांचा विचार न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी आ. शशिकांत शिंदे, पक्षनिरीक्षक सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवक अध्यक्ष तेजस शिंदे, सरचिटणीस राजकुमार पाटील, किरण साबळे-पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा जयश्री पाटील, समिंद्रा जाधव आदि पदाधिकारी उपस्थित होते.