Your Own Digital Platform

सातार्‍यातील बागांच्या कामात भ्रष्टाचार


सातारा : सातार्‍यातील बागांची सुमारे साडेचार कोटींची कामे विविध ठेकेदारांना देण्यात आली असून त्यामध्ये गोलमाल झाला आहे. यासंदर्भात दै. ‘पुढारी’ने दिलेले सडेतोड वृत्‍त खरे असल्याचे सांगत या वृत्‍ताची आ. शिवेंद्रराजेंनी गंभीर दखल घेतली. वृक्षलागवड आणि त्यावर झालेला खर्च यामध्ये मोठी तफावत असून शहरातील बागांच्या ठेक्यात भ्रष्टाचार झाला आहे. वृक्षारोपणावर झालेल्या खर्चाची चौकशी करावी, अशी मागणी नगर विकास आघाडीचे नेते आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केली.

सातारा नगरपालिकेकडून अमृत योजनेतून शहरातील बागांची सुमारे 5 कोटींची कामे सुरु आहेत. पुण्याच्या निसर्ग ठेकेदाराला गेंडामाळ गार्डन 6 लाख, पुण्यशील राजमाता सुमित्राराजे भोसले उद्यान सदरबझार 63 लाख, जरंडेश्‍वर नाक्यावरील करिआप्पा चौकातील गार्डन 32 लाख, आयुर्वेदिक गार्डन गोडोली 65 लाख अशी कामे दिली आहेत. बागांचे क्षेत्रफळ, लागवड केली जाणारी झाडे आणि त्यासाठी करावे लागणारे काम यांचा मेळ घातला तर या कामात कोट्यवधींचा गोलमाल झाल्याचे उघड करणारे वृत्‍त दै. ‘पुढारी’ने दि. 13 रोजीच्या अंकात प्रसिध्द केले होते. या वृत्‍ताची आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी गंभीर दखल घेतली.

सातारा पालिकेच्या कारभाराची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी याचा आवर्जून उल्‍लेख केला. नगरपालिकेतील चुकीच्या प्रकारांवर प्रहार करत आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा नगरपालिकेत ठेकेदारांच्या आडून नगरसेवकच कामे घेत आहेत. सातार्‍यातील बागांच्या कामात गोलमाल झाल्याचे वृत्‍त दै. ‘पुढारी’ने सडेतोडपणे प्रसिध्द केले. सातार्‍यातील बागांचे ठेके अनेक ठेकेदारांना देण्यात आले आहेत. मात्र, त्यामागे काही नगरसेवक आहेत. बागांमध्ये केलेले वृक्षारोपण, त्यावर झालेला खर्च आणि वस्तुस्थिती पाहिली तर या कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. शहरात अमृत योजना व अन्य निधीतून साडेचार कोटींची झाडे लावण्यात येणार आहेत. मात्र, संबंधित बागांमध्ये किती झाडे लावली जात आहेत? हे पाहिले जात नाही.

शहरात बीव्हीजीच्या माध्यमातूनही कोट्यवधींची झाडे लावण्यात येत आहेत. काही ठिकाणी वृक्ष लावले तर बर्‍याच ठिकाणी अद्याप काम झालेले नाही. वृक्ष अधिकारी बाळू शिंदे काय काम करतो? वृक्षारोपण होत नाही पण शिंदेंची उंची वाढली की नाही हे बघा, असा टोलाही आ. शिवेंद्रराजेंनी लगावला. शिंदे रजेवर असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. वृक्षारोपणाच्या कामाची चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी आ. शिवेंद्रराजे यांनी केली. यावेळी विरोधी पक्षनेते अशोक मोने, सभागृह नेते अमोल मोहिते, नगरसेवक शेखर मोरे, रवींद्र ढोणे, शकील बागवान, नगरसेविका दीपलक्ष्मी नाईक, लीना गोरे, मनिषा काळोखे, सोनाली नलवडे आदी उपस्थित होते.