फलटणच्या एका माणसामुळेच जिल्ह्याला कीड : उदयनराजे भोसले


फलटण : फलटण मधल्या एका माणसामुळेच जिल्ह्याला कीड लागली आहे आणि तो माणूस माझं नाव घेत असेल तर त्याचं चॅलेंज मी स्वीकारत आहे. आमदार, खासदार कोणीही असो, मला लबाडी अजिबात चालत नाही. फलटणकरांच्या बांडगुळपणामुळे नको त्यांचं फावलंय, असा टोला खा. उदयनराजे भोसले यांनी फलटण येथे पत्रकारांशी बोलताना लगावलाफलटणमध्ये एका खासगी दौर्‍यानिमित्त आले असताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना ना. रामराजे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. फलटणमध्येच खा. उदयनराजेंनी अशी टोलेबाजी केल्यामुळे खा. उदयनराजे व ना. रामराजे यांच्यातील कलगी तुरा पुन्हा रंगणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

खा. उदयनराजे म्हणाले, देशात लोकशाही आहे त्यामुळे खासदारकीसाठी कोणीही उभा राहू शकतो. जनतेने संधी दिल्यास कोणीही आमदार, खासदार होऊ शकतो, पण टिकाटिप्पणी करताना प्रत्येकाने आत्मपरिक्षण केले पाहिजे. जिल्ह्यात माझ्यावर बिनबुडाचे आरोप होत असतील तर ते मी सहन करून घेणार नाही. आतापर्यंत मी सहन करत आलो आहे, पण सहनशक्तीलाही मर्यादा आहेत. लबाडी मी केली नाही, सडेतोड उत्तर द्यायला मी तयार आहे. समोरासमोर कुठेही, केव्हाही, कोणत्याही व्यासपीठावर बोलवा, माझी तयारी आहे. पण फलटणकरांनी बांडगुळपणा सोडला पाहिजे. फलटणकरांनी हाक द्यावी, कोणताही प्रश्‍न हाताळायला मी तयार आहे, पण मला साथ द्यायला हवी. फलटणला गतवैभव प्राप्त करुन देऊ शकतो.

कुठं मालोजीराजे आणि त्यांच्यानंतर फलटणचं काय झालंय हे बोलायलाच नको. मालोजीराजांनी फलटणमध्ये विकासाची गंगा आणली आणि त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजांनी घराघरात भांडणे लावून फलटणचे वाटोळे केले आहे. सामान्यांपैकी कोणीही तयार व्हा, फलटणला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल, असे आवाहन करुन उदयनराजे म्हणाले, फलटणमध्ये आलोय, तुमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. प्रत्येकाने विचार केला पाहिजे, एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे. आपण का जगायचं, याचा विचार करावा. मी हा विचार केला आहे..

No comments

Powered by Blogger.