Your Own Digital Platform

खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज


खंडाळा : खंडाळा तालुका हा कायम दुष्काळी म्हणून गणला जातो. लहरी पावसावरच तालुक्यातील शेती होते. मात्र, यंदा मान्सून वेळेत दाखल झाल्याने शेतामध्ये पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेग आला आहे. या पावसाने बळीराजा सुखावला असून खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषीविभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे.धोम-बलकवडी, निरा-देवघर या धरणातील पाणी तालुक्यात आल्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. धरणातील पाण्यामुळे हुलगा, मटकी पिकणार्‍या क्षेत्रात घट झाली असून बागायती क्षेत्र वाढू लागले. 67 महसूली गावे असणार्‍या तालुक्याचे 52 हजार 763 हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे. त्यामध्ये लागवडी लायक क्षेत्र 39 हजार 431 हेक्टर, पडीक क्षेत्र 13 हजार 332 हेक्टर असून बागायती क्षेत्र 14 हजार 777 हेक्टर , जिरायती क्षेत्र 24 हजार 654 हेक्टर व तलाव, कालवा , पाझर तलावाखाली 1 हजार 20 हेक्टर क्षेत्र आहे. तसेच वीर धरणा करता 957.43 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे.तालुक्यातील टंचाईग्रस्त 15 गावे घोषित केली असली तरी सध्या एका गावाला एका टँकरने दोन खेपा सुरु आहेत.

तालुक्यात दरवर्षीच कमी अधिक प्रमाण पाऊस होतो. सरासरी 416 मिमी पावसाची नोंद शासन दफ्तरी आहे. खरीप हंगामासाठी सर्वसाधारण 13 हजार 56 हेक्टर, रब्बीसाठी सर्वसाधारण 22 हजार 483 हेक्टर तर 95 हेक्टर उन्हाळी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. खरीप हंगामात तालुक्याच्या पश्‍चिम भागात झगलवाडी, लिंबाचीवाडी, घाडगेवाडी, कर्नवडी, कान्हवडी, भाटघर, हरतळी, राजेवाडी, विंग, गुठाळे या गावात भात पीक घेतले जाते तर तालुक्यातील अन्य गावात नाचणी, बाजरी, मका, तूर, मुग, उडीद, घेवडा, वाटाणा, भुईमूग, सोयाबीन, ऊस, कांदा, भाजीपाला घेतला जातो.

गतवर्षीच्या तुलनेत येत्या हंगामासाठी बाजरी व भात पिकाचे लक्ष्य वाढीव आहे. सोयाबीन पिकाचे लक्ष 1 हजार 69 हेक्टर असून ऊसाच्या क्षेत्रामध्येही वाढ करण्याचे टार्गेट आहे. नुकत्याच खरीप हंगाम आढावा सभेत घेवडा पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हा कृषी विभागाच्यावतीने सूचित करण्यात आले आहे. तसेच निविष्ठा विक्री केंद्रामध्ये बियाणे 68, रासायनिक खते 78 आणि किटकनाशके 62 अशी आहे. तर ग्रेडनिहाय खतांची अडचण येणार नसल्याचे सांगण्यात आले.

सन 2017-18 पासून नव्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जात आहे. त्यासाठी 36 अनु. जातीच्या शेतकर्‍यांची निवड करण्यात आली आहे. या योजनेत लाभार्थ्यांना नविन विहिर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, विद्युत पंप संच, वीज जोडणी, सुक्ष्म सिंचन, शेततळयाचे अस्तरीकरण याकरता दहा लाभार्थ्यांवर दोन लाख सतरा हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना अडचणीचे ठरत आहे. या योजनेला थंडा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते. चालूचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाच्या प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे तर दोन वेळा वळीव आणि शुक्रवारी मान्सूनचा पाऊस बरसल्याने शेतीकामांना वेग आला आहे. पेरणीपूर्व कामा बरोबर पेरणीच्या तयारीची लगबग करताना शेतकरी दिसून येत आहेत .