Your Own Digital Platform

मलकापूर निवडणुकीत हिशोब चुकता करतो : अतुल भोसले


कराड : मला राज्यमंत्रिपद जाहीर झाल्यावर काही जणांच्या पोटात मळमळ झाली. त्यांची मळमळ पोटातून ओठांवरही आली. पण ज्यांनी राज्याचे प्रमुखपद भूषविले त्यांना असे बोलणे शोभते का? तुम्ही जे बोललाय त्याचा हिशोब येत्या दोन महिन्यात चुकता करणार आहे. मलकापूरमध्ये परिवर्तन घडविल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना.डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला.डॉ. भोसले यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाल्याबद्दल मलकापूर येेथे आयोजित जाहीर सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कराड विकास सेवा सोसायटीचे संचालक शामराव शिंदे होते.

समारंभात मलकापूर, आगाशिवनगर, शास्त्रीनगर येथील नागरिकांच्यावतीने व विविध संस्था-संघटनांच्यावतीने ना.डॉ भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जि. प. सदस्य अशोकराव थोरात, नगरसेवक हणमंतराव जाधव, वनिता लाखे, माजी नगराध्यक्षा शारदाताई खिलारे, आबासाहेब गावडे, कराडचे नगरसेवक हणमंतराव पवार, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, श्री लक्ष्मीदेवी सोसायटीचे चेअरमन श्रीरंग जगदाळे, विकास पवार, भाजपाचे शहराध्यक्ष सूरज शेवाळे, ओम आगाशिव नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष आशिष थोरात, मुजावर ओबीसी संघटनेचे अध्यक्ष राजुभाई मुल्ला, बाळासाहेब घाडगे, सुरेश खिलारे, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. भोसले यांनी आ.चव्हाण यांच्या निष्क्रीयतेचा पाढाच वाचला. कराड शहराला मुख्यमंत्रीपद असताना त्यांनी साडेतीन वर्षात केवळ 13 कोटी रूपयांचा निधी दिला. पण आम्ही गेल्या दीड वर्षात शहराच्या विकासासाठी तब्बल 23 कोटी रूपयांचा निधी भाजप सरकारच्या माध्यमातून आणला. आत्ताही मुख्यमंत्र्यांकडे 65 कोटींची मागणी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास मंत्र्यांना कराडच्या नगरसेवकांची बैठक घेऊन निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत. अशोकराव थोरात यांनी दक्षिणमध्ये विकासाला गती मिळाल्याचे सांगितले.

1000 वह्यांची भेट

डॉ. अतुल भोसले यांना मलकापूर येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी खास तयार केलेल्या 1000 वह्यांची अनोखी भेट दिली. या 1000 वह्यांचे वितरण मलकापूरमधील गरजू विद्यार्थ्यांना केले जाणार असून, ही भेट माझ्यासाठी आत्तापर्यंतची विशेष भेट असल्याचे ना. भोसले यांनी सांगितले. तसेच प्रकाश जाधव व प्रा. उमेश जाधव यांनी स्वत: पेंटींग केलेली श्री विठ्ठलाची प्रतिमा भेट दिली.