Your Own Digital Platform

कराड : दर वाढवून घेण्यासाठीच धैर्यशिल कदम यांची उठाठेव आमदार आनंदराव पाटील


कराड : धैर्यशिल कदम यांनी पक्ष शिस्तीचा भंग केला आहे. भाजपाचे नेेते चंद्रकांत पाटील यांच्यासह ना. सदाभाऊ खोत, डॉ. अतुल भोसले यांच्या भेटी घेऊन त्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कॉंग्रेस पक्षाशी गद्दारी केली आहे. निष्ठावंत कॉंग्रेस कार्यकर्ते पक्षासोबतच आहेत. त्यामुळे पक्षाची झूल काढून निवडणुकीला सामोरे जावे. केवळ स्वत:चा दर वाढवण्यासाठीच धैर्यशिल कदम यांची उठाठेव सुरू असल्याचेही जोरदार प्रत्युत्तर कॉंग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील यांनी दिले आहे.धैर्यशिल कदम यांच्यासह आ. जयकुमार गोरे यांच्यासारखी मंडळी सातत्याने कॉंग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्ष पदाबाबत वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. 

आपण माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगताच एका क्षणात राजीनामा देणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. मी ताम्रपट घेऊन आलेलो नाही, असे सांगूनही वारंवार जिल्हाध्यक्ष पदाबाबत सातत्याने बदनामीकारक विधाने करून आ. पृथ्वीराज चव्हाण यांना कमीपणा आणण्याचे काम सुरू आहे. कॉंग्रेस कार्यकर्ते निवडणुकीद्वारे जिल्हाध्यक्ष ठरवतील, असे सांगत 2009 च्या निवडणुकीवेळी धैर्यशिल कदम यांनी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. मात्र नंतर काय देवाणघेवाण झाली? हे माहिती नाही. आता पुन्हा दर वाढवून घेण्यासाठी मी निवडणूक लढवणारच अशी वल्गना आत्तापासूनच केली जात आहे. कोणत्याही स्थितीत कराड उत्तरेत कॉंग्रेस कार्यकर्ते वरिष्ठांचे आदेश मानत आघाडी धर्मही पाळतील, असे स्पष्ट संकेतही आ. आनंदराव पाटील यांनी दिले आहेत.