वाईत काँक्रिटीकरणास विरोध करणार्‍यास ‘धरले’


वाई : महागणपती घाटासमोरील दक्षिण तीरावरील काँक्रिटीकरणाचे काम सुरू राहिल. कोणा व्यक्तीच्या आडमुठ्या धोरणामुळे ते बंद होणार नाही. एक व्यक्ती वाईकरांना वेठीस धरुन शहराचा विकास रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. नदीपात्राला धोका निर्माण न करता हे काम सुरू असून उत्कृष्ट दर्जाचे काम होत आहे, असे मत नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केले. मात्र, समूह संस्थेचे अध्यक्ष मकरंद शेंडे यांनी हे काम अडवले असून त्यांनी नियमाप्रमाणे पूर रेषेच्या आत कोणतेही काम करता येत नसल्याने आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे सांगितले. यामुळे बुधवारी पालिका पदाधिकारी व शेंडे यांच्यात काहीवेळ शाब्दीक चकमक उडाली.महागणपती घाटासमोरील दक्षिण तीरावरील नदीपात्रालगतचे काँक्रीटीकरणाचे काम थांबविण्यासाठी समूह संस्थेचे अध्यक्ष मकरंद शेंडे यांनी मुख्यमंत्री व पाटबंधारे मंत्र्यांची भेट घेवून तक्रार अर्ज केला होता. 

त्याबाबत वाई धोम पाटबंधारे उपविभागाच्या अधिकार्‍यांना प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. बुधवारी प्रत्यक्ष कामाची पाहणी करण्यासाठी धोम पाटबंधारे खात्याचे उपअभियंता प्रकाश जाधव व मकरंद शेंडे आले होते. यावेळी पालिका पदाधिकारी व अधिकार्‍यांनी शेंडे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. शहर विकासाचे काम आहे. नदीपात्रालगतच्या खड्डयांमध्ये दुर्गंधी साचते ते खड्डे काँक्रिटने भरून काढण्यात आल्याने घाट स्वच्छ राहील. त्यामुळे शेंडे यांनी आपली भूमिका बदलावी, असा आग्रह यावेळी पदाधिकार्‍यांनी धरला होता. मात्र, शेंडे यांनी त्याला विरोध केला असता पालिका पदाधिकारी व शेंडे यांच्यात काहीवेळ शाब्दीक चकमक उडाली.

यावेळी नगरसेवक चरण गायकवाड, भारत खामकर, सतीश वैराट, प्रदीप चोरगे, दिपक ओसवाल, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, धोम पाटबंधारे विभागाचे उपअभियंता प्रकाश जाधव आदी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.