Your Own Digital Platform

तीस दिवसांत ४२ ब्रेकडाऊन, पाटण आगाराचा विक्रम


पाटण : गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात सलग चार वर्षे प्रथम तर त्याच कालावधीत राज्यात दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या पाटण एस. टी. आगाराचे सध्या प्रशासकीय अनागोंदीमुळे अक्षरशः तीन तेरा वाजले आहेत. अधिकार्‍यांच्या या भोंगळ कारभाराचा फटका काही लाखात नव्हे तर कोटीत महामंडळाला होत आहे. तर दुसरीकडे याचा प्रवाशांनाही नानाप्रकारे फटका बसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून येथे एस. टी. ब्रेकडाऊनचे नवनवीन विक्रम मोडीत निघालेले आहेत. एप्रिल महिन्यात तीस दिवसात तब्बल बेचाळीस ब्रेकडाऊनचा जागतिक विक्रम येथे प्रस्थापित झाला आहे. याच कारभारामुळे दैनंदिन शेकडो प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार होत आहेत. दुर्दैवाने जर यात एखादा गंभीर अपघात झाला तर त्याला नक्की जबाबदार कोण ? हा अनुत्तरीत प्रश्‍न आहे. मात्र संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी त्यांनाच प्रोत्साहन देणार्‍या वरिष्ठांवरच आता कारवायांची मागणी होत आहे. पाटण एस. टी. आगाराची सध्या सर्वच बाजूंनी दयनीय अवस्था झाली आहे. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील दिवशी घाटात अचानक बस ब्रेकफेल झाली चालकाने प्रसंगावधान दाखवले नसते तर त्यातील तब्बल चाळीस प्रवाशांच्या जीवाचे बरेवाईट झाले असते. काही दिवसांपूर्वी उंब्रज येथे एका बसचे चालूमध्ये स्टिअरिंग रॉड तुटला दुर्दैवाने ही घटना जर राष्ट्रीय महामार्गावर झाली असती तर ? असे येथे नित्याचेच अपघात होत असले तरी संबंधितांना याचे कोणतेही सोयरसुतक नाही. अन्यथा यात कोणत्याही कारवाया अथवा सुधारणाही नाहीत ही वस्तुस्थिती आहे. महिन्यात एक ते दोन गाड्या ब्रेकडाऊन असे सुत्र असतानाही येथे त्याचे जागतिक विक्रम मोडीत निघत असतानाही स्थानिक व वरिष्ठ ढिम्म अवस्थेतच पहायला मिळतात.

काही मान्यवर तर कानात हेडफोन घालून गाणी ऐकण्याच्या तंद्रीत असल्याने त्यांचे कान हे प्रवाशी अथवा कर्मचार्‍यांच्या समस्या ऐकायला कधी मोकळेच नसतात. तर काहीजन रजा मंजुरी अथवा दैनंदिन ड्युटी लावायला रंगीत संगीत पार्ट्यांची मागणी करतात अशांमुळे मग प्रामाणिक मंडळी वैतागली आहे. एकतर अनुभवी अधिकारी नाहीत आणि जे आहेत त्यांना मुळ कामापेक्षा नको त्या गोष्टीतच अधिक रस आहे. त्यामुळे एका बाजूला सातत्याने ब्रेकडाऊन आणि दुसरीकडे ज्यादा पल्याचे रद्द धोरण त्यामुळे हा आगार दिवसेंदिवस अधिकाधिक तोट्यातच चालला आहे. मध्यंतरी हाच आगार बंद करण्याचे काम चालू होते मात्र आता असे अधिकारी असतील तर मग तो आपोआपच बंद होईल यात शंकाच नाही.

चांगले उत्पन्न देणार्‍या रस्त्यांवरील बसेस बंद करण्यात आल्या आहेत. तर या आगाराची बंद पडलेली बस हमखास रस्त्यावर पहायला मिळत असल्याने मग या आगाराच्या बसमधूनच्या प्रवासाचा आता सर्वांनीच धसका घेतला आहे. त्यामुळे खाजगी, बेकायदेशीर वाहतूक व लक्झरी बसेस जोमात चालू आहेत. ऐन धंद्याच्या हंगामातच या गोष्टी असल्याने मग येथील

मान्यवर मंडळीचे खाजगी वाहतूकदारांशी काही साटेलोटे आहे का असा संशयही येथे व्यक्त केला जात आहे. या महाभयंकर प्रकाराची आता एस. टी. च्या वरिष्ठांनीच नव्हे तर राज्य शासनातील मान्यवरांनीही गांभीर्याने दखल घेऊन एस. टी. चा हा कोट्यवधीचा तोटा तर भरून काढावाच शिवाय प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा नाठाळपणा करणार्‍या याच संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांचेवर कठोर कारवाया कराव्यात अशाही मागण्या आता सर्वच स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत.