गर्भपात औषधात वाटेकरी कोण-कोण?


सातारा : गुंड दत्ता जाधव याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिचा सातार्‍यातीलच एका डॉक्टरकडून गर्भपात केल्याने आता पुन्हा एका बेकायदा गर्भपात औषध साठ्याला पुष्टी मिळाली असून अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. मार्च महिन्यात सातार्‍यात (हिरापूर) बेकायदा गर्भपात औषधांचा साठा सापडल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली असताना अजूनही या साखळीतील एजंट, डॉक्टर मोकाटच असल्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. दरम्यान, पहिल्या तपासातील या त्रुटी ‘अर्थपूर्ण’ असल्याची चर्चा आता जोर धरू लागल्याने त्याच्या मुळाशी जाण्याची मागणी होत आहे.गुंड दत्ता जाधव याच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सरसकट गुंडगिरी मोडीत काढत दत्ता जाधव याला थेट ‘मोका’ लावला. मोका लावल्यानंतर तो पसार होता. याच कालावधीत सातारा व सांगली पोलिस त्याच्या शोधासाठी जत येथे गेल्यानंतर पोलिसांवर हल्‍ला झालेला आहे. या घटनेने पोलिसांसमोर आव्हान बनले असतानाच अखेर सातारा पोलिसांनी त्याला प्रतापसिंहनगर येथून अटक केली. सध्या दत्ता जाधव हा मोक्‍कांतर्गत पुसेगाव पोलिसांकडे अटकेत आहे.

पाच दिवसांपूर्वी दत्ता जाधव याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी 13 वर्षांची असून तिला गर्भ राहिल्यानंतर तिचा सातार्‍यातीलच डॉक्टरकडून गर्भपात केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अवघ्या 13 वर्षाच्या मुलीबाबत गुंड दत्ता जाधव याच्याडून अशी घटना घडल्याने त्याबाबत कमालीची चीड निर्माण झाली असून संतापाची लाट आहे. दत्ता जाधव मोक्‍कामध्ये असल्याने पुणे कोर्टाच्या परवानगीने त्याला पोक्सोमध्ये अटक करण्याची प्रक्रिया सुरु आहेे.

दरम्यान, सातारा शहरानजीक हिरापूर येथे मार्च महिन्यात बेकायदा गर्भपात औषधाचा साठा सापडल्याचे प्रकरण घडलेले आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग तथा एलसीबी करत होती. मुळातच तालुका पोलिस ठाण्यात बेकायदा औषधसाठा प्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला. पुढे हा तपास एलसीबीकडे वर्ग करण्यात आल्याने एलसीबीने एकूण पाच जणांना अटकही केली मात्र त्यापुढे तपासच सरकलेला नाही. एलसीबीच्या तपासात चौघांच्या टोळीकडून केवळ एकालाच गर्भपात औषधाचे किट दिल्याचे समोर आले आहे. यामुळे संशयित आरोपींची संख्या पाच एवढीच राहिली आहेे.

वास्तविक बेकायदा औषधसाठा प्रकरणाने कमालीचे हातपाय पसरलेले आहेत. गर्भपात औषधसाठा प्रकरणातील मेडिकल एजंटांकडून बेकायदा गर्भपातच्या अनेकांना गोळ्या विकल्या गेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून हे रॅकेट सुरु आहे. औषध विके्रत्यांचे एजंट, मेडिकल व डॉक्टर अशी साखळी यामध्ये गुंतलेली आहे. याशिवाय आणखी जिल्हाभर हे रॅकेट असताना केवळ पाच जणांवरच कारवाईचा दंडूका उगारुन बाकीच्यांना घाबरेघुबरे करुन अर्थपूर्ण ‘सेफ’ करण्यात आलेले आहे. पाच संशयितांच्या पुढे मात्र तपास सरकला नसल्याने माशी नेमकी कुठे शिंकली? याबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.

यातच आता दत्ता जाधव याच्यावर जबरदस्तीने गर्भपात केल्याची तक्रार झाल्याने मेडिकल औषध विक्रेते एजंट, मेडिकल व डॉक्टर हे त्रांगडे कसे एकमेकांमध्ये गुंतले आहे, हेच आता उघडे झाले आहे. दत्ता जाधव याने डॉक्टरकडून अल्पवयीन मुलीचा गर्भपात केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामुळेया प्रकरणाला आता पुन्हा बेकायदा गर्भपात औषध साठ्याचाच वास येत आहे. त्या डॉक्टरने गर्भपातासाठी कोणती औषधे वापरली? ती औषधे कोठून घेण्यात आली? बेकायदा गर्भपात औषधसाठा प्रकरणातील संशयितांची यामधील डॉक्टरशी किंवा अन्य कोणाशी लिंक आहे का? तसे असल्यास मग त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई का झाली नाही? एलसीबीच्या तपासात ही बाब कशी काय आली नाही? कारवाई न करण्यासाठी यंत्रणा कशी, कोणी व कितीमध्ये मॅनेज केली? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. यामुळे पोलिसांच्या पुढील तपासाकडे आता लक्ष लागले आहे.

कोरेगावच्या मांडवलीत मोठे ‘यश’

बेकायदा गर्भपात औषध साठ्यामध्ये कोरेगाव तालुक्यातील एकाने 10 गोळ्यांचे किट घेतल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांच्या रेकॉर्डवर आपण खल‘नायक’ होऊ नये यासाठी एका चोराने ‘मोरा’प्रमाणे थुईथुई नाचत मांडवली केली आहे. तपास यंत्रणेला इथेच ‘प्रथम यश’ आल्याने याप्रमाणेच अनेकांना बोटावर नाचवले आहे. बेकायदा गर्भपात औषध साठा प्रकरणात असे 50 ते 60 ‘बकरे’ बनले असून त्यातूनच ‘लाखों’ची उड्डाणे झाली आहेत. आता सातार्‍यातील डॉक्टरनेच गर्भपात केल्याने त्यासाठी त्याने कोणती औषधे वापरली व ती कोणाकडून घेतली हे समोर आल्यानंतर अनेक धक्‍कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तसेच अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याने तो गुन्हा असल्याचे कायदेशीर सल्‍लागारांचे म्हणणे आहे.

No comments

Powered by Blogger.