आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

उरमोडीचे पाणी म्हसवड पर्यंत आणण्यासाठी पालिका सरसावली


म्हसवड : कोणत्याही परिस्थितीत उरमोडीचे पाणी हे माणगंगा नदीपात्रातुन ते म्हसवड मार्गे राजेवाडी तलावात आले पाहिजे यासाठी म्हसवडसह परिसरातील बहुसंख्य शेतकर्यांनी केलेल्या आंदोलनाला यश आले असुन म्हसवडकरांची पाण्यासाठी सुरु असलेली तडफड पाहुन राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांनी म्हसवड पालिकेने हमीपत्र द्यावे अशा सुचना केल्या होत्या, त्यानुसार आज नगराध्यक्ष तुषार विरकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची तातडीची बैठक संपन्न होवुन त्यामध्ये उरमोडीच्या पाण्यासंदर्भात पालिकेने हमीपत्र देण्याचा ठराव बहुमताने मंजुर करण्यात आला. दरम्यान या ठरावामुळे उरमोडीचे पाणी म्हसवड पर्यंत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती सविता म्हेत्रे यांनी दिली.

उरमोडीचे पाणी हे म्हसवड पर्यंत सोडावे यासाठी गत अठवड्यात येथिल शेतकर्यांनी माजी नगराध्यक्ष विलासराव माने, कैलास भोरे, अनिल पोळ, सर्जेराव माने, बाळासाहेब माने, युवराज सुर्यवंशी, आप्पासाहेब पुकळे, डॉ. प्रमोद गावडे, किशोर सोनवणे, जयराज राजेमाने यांच्यासह नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांच्या नेतृत्वाखाली म्हसवड बंद करुन रास्ता रोको आंदोलन केले होते, त्यावेळी उरमोडीच्या अधिकार्यांनी आंदोलनाला सामोरे जाताना पाण्यासाठी शेतकर्यांनी रोख रक्कम भरावी अशी अट घातली होती या अटीमध्ये पैशाची हमी ही म्हसवड पालिकेने द्यावी त्यासाठी पालिकेचा तसा ठराव व हमीपत्र द्यावे असे सांगितले होते, त्यानुसार म्हसवडकर जनतेशी आपली बांधीलकी असल्याचे दाखवत पालिकेचे नगराध्यक्ष तुषार विरकर यांनी म्हसवडकर जनतेसाठी काय पण म्हणत ही अट मान्य केली होती, मात्र त्यानंतर सत्ताधारी गटातुनच याबाबत परस्पर विरोधी विधाने होवु लागल्याने म्हसवड पर्यंत उरमोडीचे पाणी पोहचणार का ? यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले गेल्याने अखेर यासंदर्भातील निर्णयाचा चेंडु पालिकेचे गटनेते धनाजी माने यांनी पार्टी प्रमुख असलेल्या शेखर गोरे यांच्या कोर्टात टाकला, शेखर गोरे यांनीही परिस्थितिचे गांभीर्य ओळखुन पालिकेत शेतकर्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा यासाठी तातडीची सभा बोलवुन तसा प्रस्ताव करण्याच्या सुचना नगराध्यक्ष विरकर यांच्यासह परिवर्तनच्या सर्व नगरसेवकांना दिल्या होत्या, त्यानुसार आज दि. २३ रोजी पालिकेला सुट्टी असताना देखील केवळ उरमोडीच्या पाण्यासंदर्भात पालिका सभागृहात नगराध्यक्ष तुषार विरकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची तातडीची बैठक संपन्न होवुन त्यामध्ये उरमोडीच्या पाण्यासंदर्भात पालिकेने हमीपत्र देण्याचा ठराव मांडत तो बहुमताने मंजुरही केला. 

दरम्यान या बैठकीकडे म्हसवडसह पंचक्रोशीतील सर्व शेतकरीवर्गाचे लक्ष लागुन राहिले होते मात्र सभागृहात या विषयाला मंजुरी मिळाल्याने शेतकर्यांनी आनंद व्यक्त करीत सत्ताधारी गटाचे व शेखर गोरे यांचे आभार मानले.जनतेसाठी कायपण - शेखर गोरे

पालिका निवडणुकीत आपण म्हसवडकर जनतेला शब्द देताना या जनतेसाठी कायपण करु असे आश्वासन दिले होते त्यानुसार आज उरमोडीच्या पाण्यासंदर्भात भरावी लागणारी सर्व रक्कमही भरण्याची त्यांनी स्वत:ही भरण्याची तयारी असल्याचे सांगत जनतेसाठी आपण कायपण करु शकतो असे दाखवुन दिले.

शेतकर्यांनीही केले पैसे गोळा 


सदर उरमोडीचे पाणी हे राजेवाडी तलावात पोहचण्यासाठी शेतकर्यांना सुमारे १७ लाख रुपये एवढी रक्कम उरमोडीच्या खात्याकडे भरावी लागणार आहे, ही रक्कम जमा करण्याचे काम माजी नगराध्यक्ष विलासराव माने, युवराज सुर्यवंशी, धनाजी माने, कैलास भोरे हे करीत आहेत.