Your Own Digital Platform

यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा प्रवेश क्षमता जास्त


सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात आलेला दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. सातारा शहरासह जिल्ह्यात यावर्षी अकरावी प्रवेशासाठी शहर व परिसरातील नावाजलेल्या शाळा महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा कल असणार आहे. दरम्यान 40 हजार 241 उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या असून कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त शाखेचे मिळून 49 हजार 680 जागांची प्रवेश क्षमता आहे त्यामुळे कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नसल्याचे सांगण्यात येते.सातारा जिल्ह्यात किंबहुना सातारा व कराड शहरात अकरावीसाठी प्रवेशाचा दरवर्षीप्रमाणे ठराविक कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यासाठीच विद्यार्थ्यांचा हट्ट असतो. त्यामुळे यावर्षीही सातार्‍यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, महाराजा सयाजीराव विद्यालय, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय तर कराडमधील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज, वेणुताई चव्हाण आर्टर्स कॉमर्स, सद‍्गुरू गाडगे महाराज कॉलेज, महिला महाविद्यालय या कॉलेजमध्ये अकरावी प्रवेशासंदर्भात दरवर्षी घोळ असतो त्यामुळे यावर्षीही या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. बहुतांश कॉलेज माध्यमिक शिक्षण विभागाने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे व गुणवत्तेनुसारच प्रवेश प्रक्रिया राबवत असतात.

सातारा जिल्ह्यात 40 हजार 241 विद्यार्थी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात कला शाखेत अनुदानीत 15 हजार 460, विनाअनुदानित 3 हजार 360, स्वयंअर्थ सहाय्यित 230 असे मिळून 19 हजार 60 जागा आहेत. वाणिज्य शाखेत अनुदानीत 7 हजार 80, विनाअनुदानित 1 हजार 120, स्वयंअर्थ सहाय्यित 880 असे मिळून 9 हजार 80 जागा आहेत., विज्ञान शाखेत अनुदानीत 11 हजार 200, विनाअनुदानित 3 हजार 840, स्वयंअर्थ सहाय्यित 2हजार 860 असे मिळून 17 हजार 900 जागा आहेत. संयुक्त शाखेमध्ये अनुदानीत 3 हजार, विनाअनुदानित 240, स्वयंअर्थ सहाय्यित 400 असे मिळून 3 हजार 640 जागा आहेत. असे मिळून 49 हजार 680 प्रवेश क्षमता आहे.

छत्रपती शिवाजी कॉलेज, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, कला व वाणिज्य महाविद्यालय, कन्या शाळा, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, महाराजा सयाजीराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सुशीलादेवी साळुंखे हायस्कूल, भवानी विद्यामंदीर, हणमंतराव चाटे ज्युनिअर कॉलेज, श्रीपतराव पाटील कॉलेज, छाबडा कॉलेज, यशोदा शिक्षण संस्था, सेंट पॉल स्कूल, शाहू अ‍ॅकॅडमी, व्यवसाय शिक्षण शाखेसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातारा, कराड येथील वेणूताई चव्हाण कॉलेज, सद‍्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स यासह विविध शाळा महाविद्यालयात मुबलक प्रवेश क्षमता असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागातून देण्यात आली.

गौरीशंकर नॉलेज सिटी, यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ, समर्थ एज्युकेशनल ट्रस्ट, विद्यावर्धीनी चॅरीटेबल ट्रस्ट व अन्य ट्रस्टच्या शिक्षण संस्थामध्ये विविध कोर्सेस उपलब्ध के आहेत. त्यामुळे विद्यार्थींचा कल कोणत्या शाखेकडे जास्त आहे हे प्रवेश घेतल्यानंतरच समजले जाणार आहे. प्रवेश क्षमता व विद्यार्थी उत्तीर्णचे प्रमाण यात मोठी तफावत आहे. त्यामुळे एकही विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहणार नाही.