बळीराजा सुखावला; पेरणीच्या कामात रमला


सातारा : जिल्ह्यात विशेषत: पश्‍चिमेकडील तालुक्यात सध्या पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. या पावसाने बळीराजा काहीअंशी सुखावला असून पेरणीच्या कामात तो शेत शिवारांमध्ये रमला आहे. दरम्यान, सोमवारी दिवसभर अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने पेरणीसाठी वापसा नसल्याचेही दिसून आले. जिल्ह्यात पावसाळी वातावरण असले तरी मान्सूनने जोर पकडल्याचे चित्र अद्याप तरी नाही. दिवसभरात एखादी सर कोसळते तर एखाद्या दिवशी अधूनमधून झालेला पाऊस नागरिकांची तारांबळ उडवण्याइतपतच परिस्थिती निर्माण करत आहे. सोमवारी मात्र पश्‍चिमेकडे संततधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, हे वातावरण कायम राहून पावसाचा जोर आणखी वाढण्याची प्रतिक्षा शेतकरी करत आहेत. 

मृग नक्षत्राचा बेभरोशी कारभार यंदाही सुरूच राहिला. अद्यापही धरण पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे पाणी पातळी सामान्यच आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही स्थिती बर्‍यापैकीच म्हणावी लागेल. मृग संपून आता आद्रा नक्षत्र सुरू झाले आहे. या नक्षत्रात तरी शेतकर्‍यांना अपेक्षित असणारा पाऊस बरसेल अशी आशा आहे. अधूनमधून कोसळणार्‍या पावसाच्या हवाल्यावर बळीराजाने भविष्याची चिंता करत खरिपाची तयारी वेगाने सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. हवामान खात्याच्या दमदार पावसाच्या अंदाजामुळे शेतकरीवर्ग पुढील आडाखे निश्‍चित करून कामाला लागला आहे. सध्या पावसाची उघडझाप सुरू असून अनेकदा ऊनही पडत आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिमेस मान्सूनचा कायम जोर असतो. मात्र या भागात सध्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. पश्‍चिम भागास अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. या भागातील शेतकरी खरिप पेरणीसाठी सज्ज झाला आहे. या भागात प्रामुख्याने भाताची शेती केली जाते. त्यादृष्टीने शेतकर्‍यांनी भाताची रोपे तयार केली असून खाचरांचीही सज्जता ठेवली आहे. धूळवाफेवरील पेरण्यांनाही वेग आला आहे. मात्र, पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे. पावसाळी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पश्‍चिमेकडील तालुक्यांमध्ये गतवर्षाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण बर्‍यापैकी आहे.

No comments

Powered by Blogger.