विस्तार मोठा तरीही नागरी सुविधा परिपूर्ण


कराड : अंतर्गत सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, काही सोसायट्यांमध्ये काँक्रिटीकरण, दिवाबत्तीची सोय, बंदीस्त नाले आणि चोवीस तास सुरू असणारा शुध्द पाणी पुरवठा असा परिपूर्ण विकास वॉर्ड क्रमांक नऊ मध्ये पहायला मिळत आहे. याबाबत वॉर्डमधील नागरिकांनी विशेष करून महिला वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. खटकणारी बाब म्हणजे, गुंतवणूक म्हणून घेण्यात आलेले आणि वर्षानुवर्षे पडून असलेल्या रिकाम्या प्लॉटमध्ये उगवलेली झाडे- झुडपे आणि दलदलीमुळे शहराच्या सौंदर्यात बाधा येत आहे. लाहोटीनगर, शिंगण नगर, दयाल मार्बलच्या पश्‍चिम भागात ठिकठिकाणी नागरिकांनी गुंतवणूक म्हणून प्लॉट खरेदी करून ठेवले आहेत. मात्र त्यामध्ये ना बांधकामे करण्यात आली आहेत, ना ते प्लॉट सुस्थितीत ठेवण्यात आले आहेत. वर्षानुवर्षे ते प्लॉट पडून असल्याने त्या ठिकाणी मोठी झाडे, काटेरी झुडपे, पाणगवत उगवले आहे. पाणी साचून मोठी दलदल झाली आहे. त्यामुळे या वॉर्डच्या पर्यायाने शहराच्या सौंदर्यात बाधा येत आहे.

पावसाळ्यात या रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचून रोगराई पसरत आहे. लाहोटीनगरमध्ये काही जणांना या साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू झाला होता, असे तेथील नागरिकांनी सांगितले. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने रिकामे प्लॉट धारकांना नोटीसा काढून त्या प्लॉटची साफ सफाई करून घेण्याबाबत सूचना कराव्यात अशी मागणी, तेथील नागरिकांची आहे. ही समस्या सोडली तर या वॉर्डमध्ये सर्व काही अबादी अबाद आहे. अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. काही रस्त्यांचे काम सुरू आहे. डांबरीकरणापूर्वी ड्रेनेजचेही काम पूर्ण करण्यात आल्याने ड्रेनेजची समस्या या वॉर्डमध्ये अजिबात दिसून येत नाही. निवडणुकीपूर्वी अंतर्गत सर्व रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.

रस्त्यांबरोबरच दिवाबत्ती, चोवीस तास शुध्द पाणी आदी नागरी सुविधा अगदी शेवटच्या टोकापर्यंत पोहचविण्यात पालिका प्रशासनास यश आले आहे. रिकाम्या प्लॉटमधील झाडे झुडपे सोडली तर या वॉर्डचा सर्वांगिण विकास झाल्याचे दिसून येत आहे. येथील नागरिकांची मते जाणून घेतली असता या वॉर्डमध्ये डांबरी रस्ते, बंदीस्त नाले आणि चोवीस तास शुध्द पिण्याच्या पाण्याची चांगली सोय झाल्याचे नागरिकांनी सांगितले. विद्यामान प्रशासनाने चांगले काम केले आहे, अशा प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिक व महिला वर्गाने दिल्या.

No comments

Powered by Blogger.