दोन लाखांसाठी घेतला मित्राचा जीव


कराड : येथील बुधवार पेठेतील सचिन कांबळे या युवकाच्या हत्येप्रकरणी आठवडाभराने एका संशयिताला जेरबंद करण्यात कराड शहर पोलिसांना यश आले आहे. कुमार पंजाब पाटणकर (वय 22, रा. रुक्मिणीनगर झोपडपट्टी, कराड) असे संशयिताचे नाव आहे. विशेष म्हणजे तो हत्या झालेल्या सचिनचा मित्र होता आणि केवळ दोन लाखांच्या आमिषापोटी त्याने मित्राचाच जीव घेतल्याची धक्‍कादायक माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे.सचिन बबन कांबळे (वय 28, रा. बुधवार पेठ, कराड) याचा गळा चिरून खून करण्यात आल्याचे 30 मे रोजी रात्री उशिरा समोर आले होते. त्यानंतर रात्री उशिरा कांबळे याचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले होते. कांबळे याच्या पत्नीसह तीन संशयित आठवडाभर पोलिसांना गुंगारा देत होते. मुंबईसह परजिल्ह्यात कराड शहर पोलिसांची पथकेही रवाना झाली होती.

अखेर कुमार पाटणकर हा मंगळवारी रात्री उशिरा कराडमध्ये आल्याचे पोलिसांना समजले होते. मात्र, तो आपल्या घराकडे फिरकला नव्हता. पोलिसांकडून पाटणकरचा शोध सुरूच होता आणि त्याचवेळी तो अलगदपणे पोलिसांच्या हाती सापडला. त्यानंतर प्राथमिक चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीवेळी त्याचा या गुन्ह्यात हात असल्याचे समोर आल्याने त्यास अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर केले असता त्यास 11 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

दरम्यान, सचिन कांबळे आणि कुमार पाटणकर यांच्यासह पलायन केलेले दोन संशयित हे चौघेही मित्रच होते. मलकापूर येथील एका जमीन व्यवहारातून सचिन कांबळेच्या पत्नीला सुमारे 20 लाख रूपये मिळाले होते. खुनात सहभागी होण्यासाठी तुला दोन लाख रूपये देतो, असे आमिष कुमार पाटणकर याला दाखवण्यात आले होते. या आमिषापोटीच तो या कटात सहभागी झाला होता, अशी माहितीही समोर आली आहे. खून करून पळून गेल्यानंतर मात्र कुमार पाटणकर याला दोन लाख रूपये देण्यात आले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाली असून आपण कराडला आल्याचे पाटणकर याने पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणातील अन्य संशयित सापडल्यानंतरच कुमार पाटणकर याने दिलेल्या माहितीबाबतची वस्तुस्थिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

No comments

Powered by Blogger.