Your Own Digital Platform

गर्भपात औषध बाळगणारे डॉक्टर मोकाट


सातारा : हिरापूर (ता. सातारा) येथे बेकायदेशीरपणे सापडलेल्या गर्भपात औषधप्रकरणी जिल्ह्यातील संबंधित डॉक्टरांची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य समितीने कार्यवाही करणे गरजेचे असताना औषध विभागाच्या सहायक आयुक्तांनी दिलेल्या पत्रावर जिल्हाधिकारी कार्यालयाने काहीच कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे बेकायदा गर्भपात औषधांचा वापर करणारे डॉक्टर मोकाट आहेत.अजय सपकाळ (रा. हिरापूर, ता. सातारा) याच्या राहत्या घरातून औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी वॉच ठेवून गर्भपाताची एमटीपी किट जप्त केली होती. अजय सपकाळ याने दिलेल्या माहितीनुसार औषधांचा साखळी पुरवठादार अमीर खान, प्रशांत शिंदे व विलास देशमुख यांच्याकडे चौकशी करुन त्यांच्यावर सातारा तालुका पोलिस स्टेशनला दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रविण देशमुख याला अटक केल्यानंतर हे प्रकरण सखोल चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आले. अनियमितता आढळल्याने प्रोप्रा पंकेशकुमार ओसवाल यांच्या माया सेल्स राधिका रोड, सातारा तसेच प्रोप्रा. सुषमा देशमुख यांच्या अपूर्वा एजन्सीज, मंगळवार पेठ सातारा यांच्यावरही कारवाई करण्यात आली. देशमुख यांच्या मेडिकलमधील औषधे सपकाळकडे सापडली त्याचे बिल नव्हते. 

आणखी एका मेडिकलला याप्रकरणी नोटीस देण्यात आली. औषध प्रशासनाने सातार्‍यातील सदरबझार परिसरातील एका हॉस्पिटलची चौकशी केली होती. सपकाळकडे सापडलेले किट याठिकाणीही मिळून आले. त्याचे बिल नसल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी औषध प्रशासनाने पाठपुरावा केला. त्यानंतर औषध प्रशासनाने सातार्‍यातील एका हॉस्पिटलची नोंदणी रद्द करावी, अशी शिफारस महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे (एमएमसी) केली आहे. एमटीपी किटचा वापर करणारी इतरही काही हॉस्पिटल्स असून त्यांची चौकशी अद्याप सुरु आहे. बेकायदा गर्भपात औषधाचा वापर करणारे बरेच डॉक्टर असल्याचा शक्यता आहे. सातार्‍यातील प्रतापसिंहनगरमधील एका अल्पवयीन मुलीचा एका डॉक्टरने केलेला गर्भपात हे त्याचे उदाहरण आहे. असे असताना अशा डॉक्टरांवर कारवाई करताना औषध प्रशासनावर मर्यादा येत आहेत. संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय आरोग्य समितीने मोहीम राबवणे आवश्यक आहे. या समितीमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांचा समावेश आहे. या समितीने दुसरी समिती स्थापन करुन बेकायदा गर्भपात औषधाचा वापर करणार्‍या डॉक्टरांची शोधमोहीम राबवण्यासाठी अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्तांचा या समितीमध्ये समावेश केल्यास या कारवाईला गती मिळणार आहे. डॉक्टर आणि काही मेडिकल्सवाले मिळून बेकायदा गर्भपात औषधांचा वापर करत आहेत. त्यांना काही औषध पुरवठादार मदत करत आहेत. ही चेन उखडण्यासाठी नवी समिती गठित केल्यास बडे मासे प्रशासनाच्या गळाला लागतील. पण त्यासाठी सहायक आयुक्तांनी पाठवलेल्या पत्रावर जिल्हाधिकारी कार्यालयाने कार्यवाही करण्याची गरज आहे. दरम्यान, बेकायदा गर्भपात औषध प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणात तपासात किती प्रगती झाली? आणखी कुणावर गुन्हे दाखल केले का? याची माहिती घेण्यासाठी औषध विभागाने एलसीबीला स्मरणपत्र दिले आहे.