अभिजित चव्हाणला दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के


पाटण : पाटण तालुक्यातील चोपडी या दूर्गम गावातील अभिजित चव्हाण यानं अत्यंत गरीब परिस्थितीवर मात करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवत यश संपादन केलं. एक वेळच्या जेवणाला महाग असलेल्या चव्हाण कुटुंबाकडे अभिजितच्या या संघर्षमय यशाचे पेढे वाटायला सुद्धा पैसे नाहीत. या बिखट परिस्थितीवर मात करत अभिजितला आय ए एस व्हायचं आहे.

त्यातच अभिजित चव्हाणचे वडील अंध आणि मोठा भाऊ तसंच बहिणही अंध आहेत, घरची स्वताची जमीन नाही. त्यामुळे आई दुसऱ्याच्या शेतावर मोलमजुरी करून अभिजीतच्या शाळेचा खर्च व त्यातूनच कुटूंबाचा उदरनिर्वाह करते, त्यातच डोक्यावर कर्जाचा बोजा,. मातंग समाजातलं हे कुटुंब झाडू केरसुणी तयार करुन आपली उपजीविका करते. केरसुणी तयार करण्यासाठी अभिजीतसुद्धा आई वडिलांना मदत करतोय. एकवेळच्या जेवणाला महाग असलेल्या शिळ्या चटणी भाकरी खावून दिवस ढकलणाऱ्या या कुटुंबातला अभिजीत पहाटे लवकर उठून अभ्यास करायचा. नुसता अभ्यासच नाही तर शालेय वक्तृत्व, क्रीडा, कला प्रकारातही त्यानं जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. चोपडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलवडे इथल्या कोयना शिक्षण संस्थेच्या न्यू इग्लिंश स्कूलमध्ये अभिजीतनं शिक्षण घेतलं. 

घरी आठरा विश्व दारिद्र्य त्यामुळे अभिजीतच्या शिक्षणासाठी नाईलाजाने दुभती म्हैस विकण्याचा निर्णय त्याच्या आई वडिलांनी घेतला. तर त्याचा दहावीचा फॉर्म भरण्यासाठी त्याच्या आईनं आपल्या कानातली सोन्याची फुलं गहाण ठेवावी लागली. हे समजल्यावर अभिजितच्या दहावीच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी त्याच्या शिक्षकांनी उचलली. शाळेच्या एकाच गणवेषावर दिवस काढत, अभिजितनं दहावीत ९३ टक्के गुण मिळवत शाळेत पहिला क्रमांक पटकावला. गणित विषयात तर पैकीच्या पैकी १०० गुण मिळविले आहेत. खूप शिकून आय ए एस अधिकारी व्हायच त्याच्या स्वप्न आहे. प्रतिकूल परिस्थितीतही नाउमेद न होता यश मिळविलेल्या अभिजीतचा संघर्ष तरूण पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

अभिजितची स्वप्नं मोठी आहेत. ती सत्यात उतरवण्याची जिद्दही त्याच्याकडे आहे. मात्र त्याच्या पालकांकडे त्यासाठीचं आर्थिक बळ नाही. म्हणून या गुणवान मुलाला त्याचं ध्येय गाठण्यासाठी समाजातल्या संवेदनशील हातांच्या मदतीची गरज आहे.

No comments

Powered by Blogger.