Your Own Digital Platform

फायरिंगची घटना प्रेमप्रकरणातून


सातारा : सातार्‍यात बुधवार नाक्यावर गुरुवारी सायंकाळी झालेली फायरिंगची घटना प्रेमप्रकरणातून झाल्याचे समोर आले आहे. ज्याच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला त्या अतिक हसन शेख (वय 22, रा. बुधवार पेठ) याने याप्रकरणी तक्रार दिली आहे. दरम्यान, युवकांच्या वादात काहीही संबंध नसताना गोळी लागलेल्या जखमी युवतीची प्रकृती स्थिर असून हल्लेखोर व त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी पोलिसांचे कसून प्रयत्न सुरू आहेत. बुधवार नाका मात्र अद्यापही तणावसद‍ृश आहे.गुरुवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास संशयित ऋषभ जाधव याने भर वर्दळीच्या ठिकाणी बेछूट गोळीबार करून अक्षरश: सातारा हादरवून सोडला. संशयित ऋषभ व तक्रारदार अतिक शेख या दोघांमध्ये एका युवतीवरून वाद आहे. एकाच युवतीवर या दोघांचे प्रेम असल्याने त्यातूनच त्यांची एकमेकाला खुन्नस होती. या वादातून दोघांमध्ये दोन वेळेला खटका-खटकीही झालेली आहे. हा वाद तेवढ्यावरच न थांबता गुरुवारी त्याचे पर्यावसन फायरिंगमध्ये झाले. संशयित ऋषभने अतिकच्या दिशेने झाडलेली गोळी निरपराध युवतीला लागून ती गंभीर जखमी झाली. अश्‍विनी शेखर कांबळे (वय 24, रा.बुधवार नाका, सातारा) असे गंभीर जखमी झालेल्या युवतीचे नाव आहे. अश्‍विनी या किरणा दुकानात साहित्य आणण्यासाठी गेलेल्या असताना गोळी लागली. यावेळी अश्‍विनी यांच्याकडे दोन वर्षाचा मुलगाही होता. सुदैवाने या हल्ल्यातून तो बचावला.

घटनेनंतर जमाव संतप्त झाला होता. त्यांनी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांच्याकडे संशयिताला अटक करुन त्यालाच गोळ्या घाला अशी मागणी करण्यात आली. या सर्व घटनेनंतर निर्माण झालेला तणाव शुक्रवारीही कायम होता.

पोलिसांनी संशयित ऋषभ व त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी जोरदार मोहीम आखलेली असतानाही त्याचा ठावठिकाणा लागलेला नव्हता. संशयित ऋषभ याच्याकडे पिस्टल कोठून आले? त्याचे अन्य दोन साथीदार कोण? संशयिताकडील दुचाकी कोणाची? यामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे? अशा विविध प्रश्‍नांचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.दरम्यान, गुरुवारी रात्री उशीरा याप्रकरणी अतिक शेख याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रेमसंबंधाच्या कारणातून फायरिंग केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहेे. पोलिसांनी ऋषभ जाधव याच्याविरुध्द प्राणघातक हल्‍ला व आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोनि किशोर धुमाळ करत आहेत.

अज्ञातांवर तोडफोडीचा गुन्हा

फायरिंगमध्ये गंभीर जखमी झाल्यानंतर अश्‍विनीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारामध्ये दिरंगाई होत असल्याने नातेवाईक संतप्‍त बनले. या जमावातील काही जणांनी सिव्हीलच्या सुमो या वाहनाला टार्गेट करत त्याची काच फोडली होती. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या घटनेची माहिती सिव्हील प्रशासनाला समजल्यानंतर डॉ.आम्रपाली निकाळजे यांनी तोडफोडप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.