Your Own Digital Platform

शेतकर्‍यांचे ३३३ कोटी कारखान्यांनी थकवले


सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये 2017-18 च्या हंगामामध्ये 14 साखर कारखान्यांनी सुमारे 90 लाख टन उसाचे गाळप केले. गाळपानंतर 15 दिवसांच्या कालावधीत शेतकर्‍यांच्या खात्यांवर पैसे जमा होणे बंधनकारक असतानाही तसे झाले नाही. हंगाम संपून अडीच महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही बर्‍याच कारखान्यांनी अद्याप शेतकर्‍यांची देणी भागवलेली नाही. सह्याद्री, श्रीराम आणि स्वराज्य हे कारखाने वगळता सर्वच कारखान्यांची शेतकर्‍यांची देणी बाकी आहे. सुमारे 333 कोटी रुपये कारखानदारांनी थकवले असून आता ही देणी केव्हा मिळणार? याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात 11 कारखान्यांनी एकूण 90 लाख 3 हजार 847 टन उसाचे गाळप झाले आहे.

 सर्वच कारखान्यांनी साधारणत: अडीच ते तीन हजार यादरम्यान ऊस दर जाहीर केला होता. समाधानकारक दर मिळाल्याने शेतकर्‍यांनी कारखान्यांना ऊस दिला. मात्र, हेच उसाचे पैसे मिळवण्यासाठी आता शेतकर्‍यांना आंदोलन करावे लागत आहे. कारखान्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने अनेक सभासदांनी साखर आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. दि. 31 मे 2018 पर्यंत खालीलप्रमाणे साखर कारखान्यांची देणी बाकी राहिली आहे. अजिंक्यतारा सहकारी कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 170 कोटी 52 लाख 44 हजार रूपयांची देणी होती. यापैकी 161 कोटी 43 लाख 12 हजार रुपये शेतकर्‍यांच्या खात्यांवर जमा करण्यात आले असून 9 कोटी 9 लाख 9 हजार रुपयांची देणी अद्यापही कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत. लोकनेते बाळासाहेब

सहकारी कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 52 कोटी 23 लाख 36 हजार रूपयांची देणी होती. यापैकी 48 कोटी 55 लाख 44 हजार रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. तर 3 कोटी 67 लाख 92 हजार रूपयांची देणी अद्यापही कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत. भुईंज येथील किसनवीर सहकारी कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 168 कोटी 22 लाख 92 हजार रूपयांची देणी होती. यापैकी फक्त 72 कोटी 30 लाख 72 हजार रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर तब्बल 95 कोटी 92 लाख 20 हजार रूपयांची देणी अद्यापही कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत. कराड येथील यशवंतराव मोहिते सहकारी कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 343 कोटी 23 लाख 57 हजार रूपयांची देणी होती. यापैकी 300 कोटी 98 लाख 98 हजार रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर 42 कोटी 24 लाख 59 हजार रूपयांची देणी अद्यापही कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत. रयत सहकारी कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 97 कोटी 6 लाख 91 हजार रूपयांची देणी होती. यापैकी 64 कोटी 27 लाख 99 हजार रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर 32 कोटी 78 लाख 92 हजार रूपयांची देणी अद्यापही कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत.

खंडाळा येथील किसनवीर सहकारी कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 65 कोटी 62 लाख 70 हजार रूपयांची देणी होती. यापैकी 36 कोटी 8 लाख 5 हजार रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर 29 कोटी 57 लाख 62 हजार रूपयांची देणी अद्यापही कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत. फलटण तालुक्यातील फलटण न्यू शुगर या खासगी कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 63 कोटी 56 लाख 10 हजार रूपयांची देणी होती. यापैकी अवघी 15 कोटी 69 लाख 12 हजार रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर तब्बल 47 कोटी 86 लाख 98 हजार रूपयांची देणी अद्यापही कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत. काही दिवसांपूर्वी कारखान्याने शेतकर्‍यांना 6 कोटी रूपयांचे वाटप केल्याने ही देणी आता 41 कोटी राहिल्याचे सांगण्यात येत आहे. जयवंत शुगर या खासगी कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 173 कोटी 65 लाख 81 हजार रूपयांची देणी होती. यापैकी 165 कोटी 33 लाख 68 हजार रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर 8 कोटी 32 लाख 13 हजार रूपयांची देणी अद्यापही कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत.

ग्रीन पॉवर कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 151 कोटी 87 लाख 2 हजार रूपयांची देणी होती. यापैकी 121 कोटी 42 लाख रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर 31 कोटी 45 लाख 2 हजार रूपयांची देणी अद्यापही कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत. शरयू कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 175 कोटी 85 लाख 5 हजार रूपयांची देणी होती. यापैकी 167 कोटी 83 लाख 73 हजार रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर 8 कोटी 1 लाख 32 हजार रूपयांची देणी अद्यापही कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत. त्याचप्रमाणे जरंडेश्‍वर कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 239 कोटी 57 लाख 46 हजार रूपयांची देणी होती. यापैकी 208 कोटी 99 लाख 95 हजार रूपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर 30 कोटी 57 लाख 51 हजार रूपयांची देणी अद्यापही कारखान्याने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत.

या 11 कारखान्यांची देणी दिली असताना फलटण तालुक्यातील स्वराज्य व श्रीराम या दोन कारखान्यांनी शेतकर्‍यांची सर्व देणी भागवून अतिरिक्त पैसे दिले असल्याचे आकडेवारीवरून समोर येते. त्यामध्ये स्वराज इंडिया अ‍ॅग्रो कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 117 कोटी 32 लाख 48 हजार रूपयांची देणी होती. ही सर्व देणी शेतकर्‍यांना देऊन कारखान्याने शेतकर्‍यांना अतिरिक्त सुमारे 10 ते 12 लाख रूपयांचे वाटप केले आहे. तर श्रीराम सहकारी कारखान्यानेही गाळप केलेल्या उसाची 87 कोटी 98 लाख 12 हजार रूपयांची देणी होती. ही देणी देण्याबरोबरच कारखान्याने शेतकर्‍यांना सुमारे 10 कोटी 60 लाख रूपये अतिरिक्त दिले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारखान्याने शेतकर्‍यांना देणीपोटी तब्बल 98 कोटी 38 लाख 44 हजार रूपये दिले आहेत. त्याचरबरोबर कराड येथील सह्याद्री सहकारी कारखान्याने गाळप केलेल्या उसाची 403 कोटी 34 लाख 33 हजार रूपयांची देणी होती. ती दिली आहेत. अन्य कारखान्यांनी शेतकर्‍यांची देणी द्यावीत, अशी मागणी होत आहे.