दत्त पतसंस्थेच्या तेरा शाखाधिकार्यांना अटक
कडेगाव : येथील दत्त नागरी सहकारी पतसंस्थेने बोगस ठेवीदार तयार करून 60 लाखांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संस्थेच्या 13 शाखाधिकार्यांना कडेगाव पोलिसांनी अटक केली आहे.दत्त पतसंस्थेला शासनाने 1 कोटी 57 लाख 33 हजार रुपयांचे पॅकेज दिले होते. यामध्ये 60 लाख 17 हजार 83 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सांगलीचे लेखापरीक्षक दिलीप एडके यांनी कडेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीनुसार अटक करण्यात आलेले संस्थेचेशाखाधिकारी असे ः तानाजी महादेव गरुड (वय57, रा.कडेपूर), रविंद्र निवृत्ती शिंदे (वय 43, रा.चिखली ), जितेंद्र एकनाथ घोडके (वय 54),हणमंत जगन्नाथ जाधव (वय 51 ), वसंत महादेव शिंदे (वय 49), शिवाजी नारायण राऊत (वय 48 ), तानाजी रामचंद्र शिंदे (वय39 रा.चिखली), इनायतुल्ला मन्सूर तांबोळी (वय 54), किसनसिंह फत्तेसिंह रजपूत (वय 54), संजय सदाशिव गायकवाड (वय 51, सर्व रा. कडेगाव ), जुबेर जमुलाल बागवान (वय 41, रा.तोंडोली), संतोष शामराव भोसले (वय 41, रा. कोळेवाडी, ता. कराड), प्रशांत कृष्णाजी पाटील (वय 41, रा. ताकारी, ता. वाळवा).
डबघाईस आलेल्या पतसंस्थांना उभारी मिळावी, या उद्देशाने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनाच्या काळात राज्यातील पतसंस्थांना बिनव्याजी आर्थिक मदत करण्यात आली होती. याप्रकरणी लेखा परीक्षक दिलीप येडके यांनी कडेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पॅकेजचा लाभ भलत्यांनाच
2008 -09 मध्ये शासनाने पतसंस्थांना बिनव्याजी आर्थिक मदत केली होती. त्यामध्ये दत्त नागरी सहकारी पतसंस्थेसही आर्थिक मदत केली होती. परंतु पतसंस्थेतील मूळ ठेवीदारांना लाभ द्यावा, अशी शासनाची अपेक्षा होती. त्यामध्ये विधवा पेन्शनधारक, परितक्त्या यांना या पॅकेजचा लाभ देणे बंधनकारक होते. मात्र या सर्वांनी शाखेत बसून 652 नवीन ठेवीदारांच्या याद्या तयार करून 60 लाख 17 हजार 83 रुपयांचा अपहार केला असा आरोप आहे.
सातार्यातील शाखांचा समावेश
दत्त नागरी सहकारी पतसंस्थेस शासनाने 1 कोटी 57 लाख 33 हजार रुपयांचे पॅकेज दिले होते.या संस्थेच्या कडेगावसह तडसर ,तोंडोली, शाळगाव ,ताकारी उपाळे मायणी (जि. सांगली) आणि कराडा, विंग, मसूर, पुसेसावळी, शिवडी, म्हसुर्णी, तळमावले, पुसेगाव (जि. सातारा) अशा एकूण 16 शाखा आहेत.
Post a Comment