Your Own Digital Platform

तुळशी वृंदावन धरणाच्या दुरुस्तीला मुहूर्त


लोणंद : लोणंद-खेड बुद्रक गावच्या सीमेवर असणारे आणि गेली अनेक वर्ष शासकीय पातळीवर कोणतेच खाते आपली मालकी सांगत नसलेल्या आणी शासन दरबारी बेवारस ठरलेल्या तुळशी वृदांवन धरणाला भाजपाचे पदाधिकार्‍यांच्या पाठपुराव्यामुळे वारसदार मिळाला आहे. या धरणाच्या देखभाल दुरूस्तीचे आदेश लघु पाटबंधारे खात्याला आदेश दिले आहेत. या धरणाच्या दुरूस्तीचे आदेश दिल्यानंतर पाटबंधारे विभागाचे अधिकारी भाजपचे अनिल कुदळे, नारायण साळुंखे, सौ दिपिका घोडके , एव्हरेस्टविर प्राजित परदेशी , देविदास चव्हाण, किरण शेळके यांनी प्रत्यक्षात धरणाची पाहणी केली. त्यामुळे डागडुजीच्या प्रतिक्षेत शेवटची घटका मोजत असणार्‍या या धरणाचे आयुष्यमान वाढण्यास मदत होणार आहे. हे पाऊल उचलल्यानंतर धरणच्या परिसरातील झाडे झुडपे काढण्यासाठी आणि पोट पाटाचे पाणी पुन्हा शेतीला मिळण्यासाठी आता मुहुर्त लागण्याची आशा निर्माण झाली आहे. शासनाचा आदेशानंतर आता यांत्रिकी व लघु पाटबंधारे विभागाचा अधिकारी वर्ग काय कार्यवाही करणार याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

तुळशी वृंदावन धरणाच्या मालकी व दुरुस्तीबाबत महसूलमंत्री ना .चंद्रकांत पाटील, पाटबंधारे मंत्री ना. गिरिष महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. गिरिष बापट, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी प्रयत्न केले. तर जिल्हाउपाध्यक्ष विनोद क्षीरसागर व तालुकाध्यक्ष अनिल कुदळे यांनी पाठपुरावा केल्याने हे काम सुरू होत आहे. ज्या ठिकाणाहुन पाणी सोडण्यात येते त्या गेटची पाहणी करण्यात आली.

यावेळी या लोखंडी गेटची मोडतोड व चोरी केली होत असल्याचे निर्दशनातुन आल्यानंतर अधिकारी व पदाधिकारी यांनी याबाबत लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि सोमनाथ लांडे यांची भेट घेऊन या समस्येबाबत कारवाई करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.धरणाच्या दुरूस्तीचे आदेश झाल्यानंतर शासनाकडून धरणावर उगवलेली झाडे, झुडपे काढण्यात येणार आहे. तर निरा -देवघर, धोम- बलकवडीचे पाणी या धरणात सोडून शेतकर्‍यांनी केलेल्या पोट पाटातून पूर्वीप्रमाणे शेतीला पाणी दिले जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे काम कधी पूर्णत्वास जाते याची शेतकर्‍यांना उत्सुकता लागून राहिली आहे.