पाटबंधारे वसाहतीला चोरट्यांचे ग्रहण


सातारा : विविध समस्यांमुळे चर्चेत असलेल्या पाटबंधारे विभागाच्या वसाहतीला सध्या चोरट्यांचे ग्रहण लागले आहे. कायमच चोरट्यांच्या दहशतीखाली राहणार्‍या येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेचे तीन तेरा वाजले आहेत. पन्नाशीकडे झुकलेल्या या वसाहतीची अवस्था सुधारण्यासाठी आता तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. गेली काही वर्षे कायमच ढासळणार्‍या स्लॅबच्या घरात आणि मोडकळीस आलेल्या दारे खिडक्यांच्या आधाराने राहणार्‍या येथील कर्मचार्‍यांचा आपल्या खात्यासह पोलिसांवरील विश्‍वासही उडाला आहे.

गत काही महिन्यांपासून येथील पाटबंधारे वसाहतीमध्ये चोर्‍याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. चार-पाच जणांचे टोळके दिवसा हेरून ठेवलेले घर रात्रीच्या वेळेत साफ करत आहेत. काही दिवसांपूर्वी येथील सुरक्षा रक्षकाने एका बंद खोलीत चोरी करताना सापडलेल्या चोरट्यांना कोंडून ठेवले होते. मात्र, चोरट्यांनी थेट या खोलीच्या मागील खिडकी फोडून पळून जाताना या सुरक्षा रक्षकांवर जोरदार दगडफेक केली होती. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र, चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.

वसाहतीला संरक्षण भिंत असली तरी तिची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.कॅनॉलनजीक काही वर्षांपूर्वी बांधलेल्या आठ स्लॅबच्या खोल्यांना भगदाडे पाडली असून चोरट्यांनी या इमारतीच्या केवळ भिंतीच शिल्लक ठेवल्या आहेत. तर जवळच असलेल्या मार्केटची अवस्थाही याहून वेगळी नाही. अवघी 11 दुकाने कशीबशी तग धरून आहेत. कोणे एकेकाळी संपूर्ण वसाहतीच्या कौटुंबिक गरजा भागवणारे हे मार्केट आता शेवटच्या घटका मोजत आहे.

दरम्यान, सेवानिवृत्तीनंतरही निवासस्थान न सोडता तब्बल 18-19 वर्षे आपल्या सुना, नातवंडे यांच्यासह राहणार्‍या कर्मचार्‍यांना विचारणारेही कोणी नाही तर एकीकडे वर्ग दोन अधिकार्‍यांच्या रूमवर कब्जा करत वर्ग तिनचे कर्मचारी सुखनैव आपली सेवा बजावत आहेत. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी संबंधित विभागातील संरक्षण इतर बाबी पाहणार्‍या अधिकार्‍याकडे असेल तर तो अधिकारी सध्या काय करतोय? आपली जबाबदारी झटकत सेवा बजावणार्‍या अशा अधिकार्‍याला त्यांच्या वरिष्ठांनी वेळीच ताकीद द्यावी, अशी मागणी होत आहे.

खासगी सुरक्षा रक्षक नेमावेत...

पाटबंधारे विभागाच्या वसाहतीसाठी शासनाने खासगी सुरक्षा रक्षक नेमल्यास चोरट्यांना आळा बसू शकतो. प्रचंड मोठा विस्तार असलेल्या या वसाहतीच्या संरक्षणासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

एकाही चोरीचा छडा नाही...

पाटबंधारे वसाहतीत आजपर्यंत झालेल्या एकाही चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दोन वर्षांपूर्वी पाटबंधारेच्या गुणनियंत्रण विभागात झालेल्या साडेतीन लाख रुपयांच्या चोरीचाही अद्याप तपास लागलेला नाही. यापाठीमागे काय गौडबंगाल आहे? शासकीय कार्यालयात झालेल्या चोरीचा जर तपास लागत नसेल तर सामान्य कर्मचार्‍यांच्या घरात झालेल्या चोर्‍याचा तपास कधी लागणार? हा प्रश्‍न अनुत्तरित आहे.

No comments

Powered by Blogger.